Kolhapur Lok Sabha Result 2024: कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती आघाडीवर
By पोपट केशव पवार | Published: June 4, 2024 08:43 AM2024-06-04T08:43:49+5:302024-06-04T08:50:58+5:30
Kolhapur Lok Sabha Result 2024 कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती आघाडीवर
कोल्हापूर : Kolhapur Lok Sabha Result 2024 जिल्ह्यात लोकसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणी आज मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) यांनी आघाडी घेतली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शाहू छत्रपती यांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान, ९ हजार १०३ पोस्टल मताची मोजणी सुरू झाली आहे. तर, हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील-सरुडकर यांनी आघाडी घेतली आहे.
महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यात मुख्य लढत आहे. मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी मतमोजणी केंद्र परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
निकालाआधीच झळकले शाहू छत्रपतींचे फलक
कोल्हापूर : निकालाला एक दिवस बाकी असतानाच कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती यांच्या विजयाचे फलक उभारण्यात आले आहेत. वारे वसाहतीमध्येही असाच फलक उभारण्यात आला असून, महत्त्वपूर्ण दसरा चौकातही भल्या मोठ्या हाेर्डिंगवर छत्रपतींचा फलक उभारण्यात आले आहेत.
कोल्हापुरातून २३ तर हातकणंगलेत २७ उमेदवार रिंगणात
कोल्हापूरला एकूण २३ उमेदवार रिंगणात होते; परंतु मुख्य लढत महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती आणि महायुतीचे खासदार संजय मंडलिक यांच्यात झाली. हातकणंगलेत २७ उमेदवार रिंगणात असले, तरी मुख्य लढत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील, महायुतीचे खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यातच झाली.
निकालाकडे राज्याचे लक्ष
दोन्ही मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर पाचवेळा कोल्हापूरला आले व आठ दिवस त्यांचा मुक्काम होता. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या. कोल्हापूरचे शाहू छत्रपती रिंगणात असल्याने देशाचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले.