गडहिंग्लज येथील हरळीनजीक अपघात, कल्याणच्या तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 01:15 PM2020-09-29T13:15:19+5:302020-09-29T13:17:27+5:30
गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हरळीनजीक दुचाकी स्लिप होवून झालेल्या अपघातात कल्याणच्या तरूणाचा मृत्यू झाला. ओंकार हरिशचंद्र शिंदे (वय २०, मूळगाव रत्नागिरी, सध्या रा. चिंचपाडा रोड, कल्याण जि. ठाणे) असे त्याचे नाव आहे. रविवारी (२७) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला.
गडहिंग्लज : गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हरळीनजीक दुचाकी स्लिप होवून झालेल्या अपघातात कल्याणच्या तरूणाचा मृत्यू झाला. ओंकार हरिशचंद्र शिंदे (वय २०, मूळगाव रत्नागिरी, सध्या रा. चिंचपाडा रोड, कल्याण जि. ठाणे) असे त्याचे नाव आहे. रविवारी (२७) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मूळचे वैरागवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संजय बिरंजे हे नोकरीनिमित्त कुटुंबियांसह कल्याण येथे राहतात. परंतु, लॉकडाऊनमुळे ते वैरागवाडीला आले आहेत. त्यांचा मुलगा शुभम याचा मित्र ओंकार हादेखील वैरागवाडीला आला होता. रविवारी (२७) रात्री जेवणानंतर शुभम व ओंकार हे दोघेही हिरोहोंडा मोटरसायकलीवरून (एमएच ०२ बीएच ७०५८) फिरण्यासाठी घराबाहेर पडले.
ओंकार हा गाडी चालवित होता तर शुभम मागे बसला होता. दरम्यान, हरळी बुद्रूक येथे इंचनाळ फाट्यानजीक दुचाकी स्लिप होवून दोघेही खाली पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ओंकार बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. शुभम बिरंजे याच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे. हवालदार संभाजी जाधव अधिक तपास करीत आहेत.
अनाथ मुलगा
ओंकारच्या आई-वडीलांचे निधन झाले आहे. त्यामुळे तो आत्याकडे कल्याणला राहत होता. त्याची विवाहित बहिणदेखील तेथेच राहते. शेजारी राहत असल्यामुळे शुभमशी त्याची मैत्री झाली होती. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये तोही शुभमबरोबर गडहिंग्लजला आला होता. ओंकारच्या अपघाती मृत्यूने त्याच्या बहिणीला मोठा धक्का बसला.
धोकादायक वळण
वर्षापूर्वी हरळीकडून इंचनाळकडे जाणाऱ्या याच वळणावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तीन महाविद्यालयीन युवकांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याच धोकादायक वळणावर ओंकारचाही बळी गेल्याने वर्षापूर्वीच्या त्या अपघाताची चर्चा घटनास्थळी होती.