पंजाबचा कमलजित कुस्तीवीर
By admin | Published: January 9, 2017 01:14 AM2017-01-09T01:14:48+5:302017-01-09T01:14:48+5:30
हितेश काला पराभूत : डॉ. डी.वाय.पाटील ट्रस्टच्या वतीने आयोजन, किरण भगतची स्वरुप सिंहवर मात
कोल्हापूर : पंजाबचा ‘भारतकेसरी’ कमलजित सिंहने तितक्याच तोलामोलाच्या हरियाणाच्या ‘हिंदकेसरी’ हितेश काला याला एकलांगी स्वारी डावावर अस्मान दाखवीत डॉ. डी. वाय. पाटील कुस्तीवीर किताबाची चांदी गदा पटकावली. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्या किरण भगतने घिस्सा डावावर हरियाणाचा भारतकेसरी स्वरूप सिंह याच्यावर मात करीत कुस्तीशौकिनांची वाहवा मिळविली.
विजेत्या भारतकेसरी कमलजितसिंहला बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, श्रीमंत शाहू महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, के. पी. पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, डॉ. संजय डी. पाटील, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव अॅड. महादेवराव आडगुळे, आदींच्या उपस्थितीत चांदीची गदा व किताब प्रदान करण्यात आला.
राजर्षी शाहू कुस्त्यांचे मैदान येथे रविवारी डॉ. डी. वाय पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने आयोजित केलेल्या या लढतीत १९४ हून अधिक लहान-मोठ्या कुस्त्या झाल्या. दुपारी दोन वाजता सुरू झालेले मैदान रात्री नऊ वाजता संपले. नूतनीकरणानंतर प्रथमच मैदान खचाखच भरले होते.
पंजाबच्या धुमछडी आखाडयांचा भारत केसरी कमलजित सिंह व हरियाणा येथील धर्मवीर आखाडयाचा हिंदकेसरी हितेश काला यांच्यामध्ये मुख्य लढत रात्री ८.०३ वाजता सुरू झालेली कुस्ती तब्बल ४६ मिनिटे सुरु होती. यात कमलजितने प्रथम ठेप लावून हितेशला चितपट करण्याचा प्रयत्न केला. त्यातून हितेशने आपली सुटका करून घेतली. यानंतर पुन्हा कमलजितने डूब काढून हितेशला एकेरी पट काढून खाली घेतले. त्यातूनही हितेशने सुटका करून घेतली. कमलजितने झोळी डावावर हितेशला चितपट करण्याचा प्रयत्न केला. पंच संभाजी वरुटे यांनी दोघांना कुस्ती निकाली करण्याची सूचना दिली. कमलजितने हितेशला पुन्हा घुटना डावावर चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातून हितेश सहीसलामत सुटला. अखेर ८.४९ वाजता कमलजितने हितेश काला याला हप्ता डाव टाकला. त्यातून सुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या हितेशला पुन्हा कमलजितने एकलांगी स्वारी डाव टाकून चितपट केले. (प्रतिनिधी)
‘हिंदकेसरी’ होणारच...
कोल्हापुरात आज कुस्ती पाहण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी उपस्थित आहेत, हे पाहून मी भारावून गेलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळे मी नक्कीच ‘हिंदकेसरी’ होईल, अशी भावना ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी व्यक्त केली.
परदेशी पाहुण्यांची उपस्थिती
जर्मन नागरिक कॉन्स्टीन व त्यांची पत्नी इरिना हे भारत फिरण्यासाठी आले आहेत. त्यांनी शतकोत्तर शाहू कुस्त्यांच्या मैदानास भेट दिली. यावेळी सुरू असलेल्या कुस्त्या पाहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यांनी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास मैदानात हजेरी लावली. यावेळी संयोजकांनी कॉन्स्टीन यांच्या हस्ते ६० किलो गटातील एक कुस्ती लावली.
‘खासबाग’मध्ये आता दररोज घुमणार शड्डू
खासबाग हे कुस्तीपटूंसाठी ऊर्जास्थान आहे. महानगरपालिकेच्या वतीने खासबाग मैदान मल्लांना सराव करण्यासाठी आता दररोज सकाळी व सायंकाळी खुले ठेवण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांनासुद्धा कोल्हापुरातील कुस्ती पाहण्याची संधी मिळणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
मुलींच्याही लढती लक्षणीय
या मैदानात पाच महिला कुस्तीवीरांच्या कुस्त्याही लावण्यात आल्या. शिंगणापूर कुस्ती केंद्राची सोनाली मंडलिक हिने अनुष्का भाट हिला गुणावर हरविले. दुसऱ्या कुस्तीत मुरगूड येथील मंडलिक कुस्ती केंद्राच्या सृष्टी भोसले हिने पट्टणकोडोलीच्या विनया पुजारी हिला गुणावर हरविले. तिसऱ्या कुस्तीत शिंगणापूरच्या दिशा कारंडे हिने सांगलीच्या संजना बागडीला सिंगल लेन्सनर डावावर चितपट केले. शिंगणापूर शाळेची राष्ट्रीय महिला कुस्तीगीर विश्रांती पाटीलने मुरगूडच्या मंडलिक कुस्ती केंद्राच्या अंकिता शिंदेला अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभूत केले.
े.