कामचुकार डॉ. पावरा यांचा पगार रोखला, महापालिका आरोग्याधिकाऱ्यांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 02:38 PM2019-09-20T14:38:50+5:302019-09-20T14:39:38+5:30
आॅगस्ट महिन्यात कोल्हापूर शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील जबाबदारी टाळणारे कामचुकार वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांचा पगार थांबविण्याचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिले. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या क्षणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मारलेली दांडी त्यांना चांगलीच महागात पडली.
कोल्हापूर : आॅगस्ट महिन्यात कोल्हापूर शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील जबाबदारी टाळणारे कामचुकार वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांचा पगार थांबविण्याचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिले. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या क्षणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मारलेली दांडी त्यांना चांगलीच महागात पडली.
आॅगस्ट महिन्यात कोल्हापूर शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली होती. तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांवर उपचार करण्याची आवश्यकता होती. अशा महत्त्वाच्या क्षणी डॉ. प्रकाश पावरा यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता दांडी मारली. त्यांनी अधिकृत रजाही दिलेली नव्हती, की कोणाला तोंडी माहितीही दिली नव्हती.
महापुराच्या काळात पूरग्रस्तांसाठी महानगरपालिकेने बऱ्याच ठिकाणी शिबिरे घेतली. रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक स्वयंसेवा संस्था, वैद्यकीय संस्था, खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हिरिरीने पुढे आल्या; परंतु डॉ. पावरा हे १५ दिवसांपासून गायब होते. त्यांच्या पत्नीही महापालिकेकडे सेवेत आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली; परंतु डॉ. पावरा कोठे गेले हे त्यांनाही सांगता आले नाही. ‘माझीही भेट होत नाही,’ असे त्यांनी आरोग्याधिकाऱ्यांना सांगितले.
महत्त्वाच्या वेळी आपली जबाबदारी टाळण्यासाठीच त्यांनी दांडी मारली, असा पक्का समज झाल्यामुळे आरोग्याधिकारी डॉ. पाटील यांनी त्यांचा पगार थांबविण्याचा आदेश दिला. पूरपरिस्थिती ओसरल्यावरच डॉ. पावरा कामावर हजर झाले आहेत. त्यांच्या या कामचुकार तसेच बेजबाबदार वृत्तीची महापालिकेत चर्चा आहे.
पूरपरिस्थितीच्या काळात माझ्यासह अनेक अधिकारी आजारी असतानाही नियोजित कामावर हजर राहून आपली सेवा बजावत होते. पूरग्रस्तांची सेवा करीत होते; परंतु डॉ. पावरा यांनी मात्र रजा न घेता दांडी मारली. त्यांना कुठेतरी चाप लागला पाहिजे म्हणून त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
- डॉ. दिलीप पाटील,
आरोग्याधिकारी