कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून कनाननगरातील तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून, दोन हल्लेखोर ताब्यात
By उद्धव गोडसे | Published: July 2, 2024 06:35 PM2024-07-02T18:35:54+5:302024-07-02T18:36:57+5:30
दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला
कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून राजारामपुरी येथील १५ व्या गल्लीत आर. के. वालावलकर प्रशालेजवळ पंकज निवास भोसले (वय ३२, मूळ रा. कनाननगर, सध्या रा. राजारामपुरी) याचा दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला. खुनाची थरारक घटना मंगळवारी (दि. २) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून गणेश विक्रम काटे आणि नीलेश विक्रम काटे (दोघे रा. कनाननगर) या भावांना ताब्यात घेतले, तर अमित गायकवाड याच्यासह आणखी एक संशयित हल्लेखोर पसार झाला.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनाननगर येथील पंकज भोसले हा राजारामपुरीतील व्यावसायिक मनिष संबरगे यांच्याकडे कारचालक म्हणून काम करीत होता. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो कार घेऊन संबरगे यांच्या घरी पोहोचला. कार पार्क केल्यानंतर बाहेर रस्त्यावर थांबलेल्या चौघांनी पंकज याला बोलवून घेतले. काही अंतर बोलत गेल्यानंतर पाठीमागून एकाने पंकजच्या डोक्यात काठी मारली. जीव वाचवण्यासाठी पंकज धावत सुटला. मात्र, कर्णिक पथ चौकात त्याला पाडून चौघांनी हल्ला चढवला. एकाने छातीवर बसून दगडाने त्याचे डोके ठेचले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पंकजला चौघे पाच मिनिटे मारत होते. मारामारीचा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तातडीने घटनास्थळी पोहोचलेले पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे आणि कॉन्स्टेबल अरविंद पाटील यांनी गणेश काटे आणि नीलेश काटे या दोन हल्लेखोरांना पकडले. हल्लेखोर अमित गायकवाड आणि त्याचा एक साथीदार दुचाकीवरून निघून गेले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
गंभीर जखमी अवस्थेतील भोसले याला पोलिसांनी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. हल्ल्याची माहिती मिळताच भोसले याची आई, दोन बहिणी आणि मित्र सीपीआरमध्ये पोहोचले. सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर कनाननगरातील तरुणांनी गर्दी केली होती. राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.