‘कंदमुळांचा उत्सव’ येत्या गुरुवारपासून रंगणार, आहारातील वापराबाबत नेमकी माहिती मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 05:28 PM2023-01-10T17:28:06+5:302023-01-10T17:28:27+5:30
प्रदर्शनात सात प्रकारच्या कंदांच्या पाककृतीबाबतची माहिती दिली जाईल
कोल्हापूर : विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती नागरिकांना व्हावी. शेतकऱ्यांनी कंदमुळांची लागवड करावी, या उद्देशाने कोल्हापुरात गुरुवारी (दि. १२), शुक्रवारी (दि. १३) कंदमुळांचा उत्सव होणार आहे. शहाजी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहातील या उत्सवात विविध ६० प्रकारच्या कंदमुळांची माहिती प्रदर्शनाद्वारे दिली जाणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर आणि कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
निसर्ग अंकुर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली एनजीओ कम्पॅशन २४ संस्थेतर्फे श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन क्लब आदींच्या सहकार्याने महाराष्ट्रातील पहिला कंदमुळांचा उत्सव होणार आहे. त्याचे उद्घाटन गुरुवारी सकाळी १० वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते होईल. पहिल्या दिवशी रात्री आठ, तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्सव सुरू राहील. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य प्राचार्य डॉ. अशोक वाली यांनी लिहिलेल्या ‘औषधी रानभाज्या’ या पुस्तकाचे प्रकाशन होईल, अशी माहिती धोंड यांनी दिली.
उत्सवातील प्रदर्शनात कणगा, काटे कणंग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, अशा सुमारे ६० प्रकारच्या कंदांच्या जाती-प्रजातींची मांडणी असणार आहे. वीस प्रकारचे कंद विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे बाचूळकर यांनी सांगितले. यावेळी अमृता वासुदेवन, कल्पना सावंत, मंजिरी कपडेकर, पल्लवी कुलकर्णी, मधुरा हावळ, सुशांत टक्कळकी उपस्थित होते.
जोयडा, बेल्हे येथून कंदांचे संकलन
या प्रदर्शनासाठी जोयडा, बेल्हे, गगनबावडा येथून विविध कंदांचे संकलन केले आहे. प्रदर्शनात सात प्रकारच्या कंदांच्या पाककृतीबाबतची माहिती दिली जाईल. कंदांपासून तयार केलेल्या विविध पदार्थांची चवही चाखता येणार असल्याचे बाचूळकर यांनी सांगितले. ‘लेट्स गेट बॅक टु अवर रूट्स’ हे ब्रीद असलेल्या या उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन धोंड यांनी केले.