विशाळगडावर सापडलेल्या 'कंदील पुष्प' वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव, कोल्हापुरातील न्यू कॉलेजच्या संशोधकांची अनोखी कृतज्ञता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 04:42 PM2024-08-07T16:42:22+5:302024-08-07T16:42:35+5:30

वनस्पतींसाठी संरक्षित क्षेत्र

Kandil Pushpa plant named after Chhatrapati Shivarai, unique gratitude of researchers of New College, Kolhapur | विशाळगडावर सापडलेल्या 'कंदील पुष्प' वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव, कोल्हापुरातील न्यू कॉलेजच्या संशोधकांची अनोखी कृतज्ञता

विशाळगडावर सापडलेल्या 'कंदील पुष्प' वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव, कोल्हापुरातील न्यू कॉलेजच्या संशोधकांची अनोखी कृतज्ञता

कोल्हापूर : येथील न्यू कॉलेजच्या अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. नीलेश पवार, चांदवड येथील डॉ. शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठामधील प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या चमूने विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील वनस्पती शोधली असून, या नवीन प्रजातीचे सेरोपेजिया शिवरायीना असे नामकरण केले आहे. 

या संदर्भातील शोधनिबंध न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला. अशा प्रकारे शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रथमच एका वनस्पतीच्या प्रजातीला संबोधित केले जाणार असून याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञाकडून घेतली जाणार आहे. अक्षय जंगम व डॉ. नीलेश पवार गेली सहा वर्षे जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. त्याअंतर्गत ऑगस्ट २०२३ मध्ये विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती आढळली. 

भारतामधील कंदील पुष्प वर्गाचे तज्ज्ञ असणारे मूळचे कोल्हापूरचे डॉ. शरद कांबळे, प्रा. एस. आर. यादव यांनी निरीक्षणानंतर ही वनस्पती नवीन प्रजाती म्हणून घोषित होऊ शकते यावर शिक्कामोर्तब केले. या नवीन प्रजातीच्या अधिवासाचा विचार करता गडावर याची संख्या मर्यादित असली तरी आजूबाजूच्या डोंगररांगांमध्येसुद्धा ही प्रजाती आढळू शकते. या संशोधनासाठी न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील आणि संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांचे सहकार्य लाभले.

वनस्पतींसाठी संरक्षित क्षेत्र

शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवत असताना स्वराज्य रक्षणात गडांचे त्याचबरोबर सभोवतालच्या जंगलांचे महत्त्व जाणले. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी संरक्षित क्षेत्रेच राखीव केली. एवढेच नव्हे तर आज्ञापत्रात रयतेसाठी "गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ती झाडे वाढवावीत, तोडू न द्यावी" असे आवाहन केले होते. त्यामुळेच या कंदील पुष्प कुळातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला शिवरायांचे नाव देण्यात आले.

Web Title: Kandil Pushpa plant named after Chhatrapati Shivarai, unique gratitude of researchers of New College, Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.