कणकवलीत राणेंना धक्का

By admin | Published: October 9, 2015 12:58 AM2015-10-09T00:58:47+5:302015-10-09T01:01:37+5:30

नगराध्यक्षपदी माधुरी गायकवाड : पारकर उपनगराध्यक्ष

Kankavalit Rana Push | कणकवलीत राणेंना धक्का

कणकवलीत राणेंना धक्का

Next

कणकवली : काँग्रेसअंतर्गत दोन गटांमध्ये झालेल्या कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संदेश पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांची निवड झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत गायकवाड यांनी काँग्रेसच्या सुविधा साटम यांचा एका मताने पराभव केला. यात मावळत्या नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांचे मत निर्णायक ठरले. पारकर गटाच्या गायकवाड यांना युतीच्या चार सदस्यांनी पाठिंबा दिला होता, तर उपनगराध्यक्षपदी पारकर गटाच्या कन्हैया पारकर यांची निवड झाली. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीवर अखेर संदेश पारकर यांचेच वर्चस्व प्रस्थापित झाले.
कणकवली नगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी निवडणूक प्रक्रिया तहसीलदार समीर घारे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी अवधूत तावडे, नायब तहसीलदार प्रभूदेसाई आदी उपस्थित होते.
(पान १ वरून) नगराध्यक्षपदासाठी पारकर समर्थक माधुरी गायकवाड यांना हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात ९ मते मिळाली, तर काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुविधा साटम यांना ८ मते मिळाली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पारकर गटाच्या कन्हैया पारकर यांना हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात ९ मते मिळाली, तर काँग्रेसचे बंडू हर्णे यांना ८ मते मिळाली.
विजयी उमेदवारांचे संदेश पारकर, शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. या निकालाबाबतची माहिती कणकवली शहरात समजताच संदेश पारकर समर्थक कार्यकर्त्यांनी तसेच शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीसह फटाक्यांची आतषबाजी केली.
पारकर शिवसेनेच्या वाटेवर
अलीकडे सहा महिन्यांच्या कालावधीत विविध घटनांवरून पारकर आणि राणे यांच्यात वितुष्ट वाढत गेले होते. बांधकाम समिती सभापती निवडीवेळीदेखील पारकर समर्थक रूपेश नार्वेकर यांची सभापतिपदी वर्णी लागली होती. त्यावेळीच काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. गेल्या काही महिन्यांत पारकर काँग्रेसमध्ये नाराज असून ते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या बातम्यांना पेव फुटला होता.
शिस्तभंगाची कारवाई करणार
काँग्रेसच्या अधिकृत तिकिटावर निवडून येऊन पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी व्हीप बजावलेल्या मावळत्या नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, माधुरी गायकवाड व सुमेधा अंधारी यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव येत्या चार दिवसांत पाठविणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

पारकरांच्या बंडाला यश
कणकवली नगरपंचायतीची निवडणूक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि युवा नेते संदेश पारकर यांच्यातच झाली. यात संदेश पारकर यांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करून दाखविले. नगरपंचायतीच्या निवडणुकीत नारायण राणेंना धक्का देत संदेश पारकर गटाच्या माधुरी गायकवाड विराजमान झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते संदेश पारकर यांच्या बंडाला यश आले आहे.
गद्दारांनी हुरळून जाऊ नये : नारायण राणे
कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेसमधून निवडून येऊन अडीच वर्षे नगराध्यक्षपदाचा उपयोग घेऊन काँग्रेसच्याच पाठीत खंजीर खुपसला. वा! काय ही निष्ठा व प्रामाणिकपणा! ना उपकाराची जाणीव, ना सभ्यता, ना नीतिमत्ता, फक्त बाता ! गद्दारी रक्तात असली की कृतीत येते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही निवडणूक, असो. नियती, नियम व न्यायालय अस्तित्वात आहेत. गद्दारांना अद्दल घडेल. हुरळून जाऊ नका, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केली.


प्रज्ञा खोत यांचे मत निर्णायक
या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. माधुरी गायकवाड यांना ९ मते मिळाली, तर काँग्रेसच्या सुविधा साटम यांना ८ मते मिळाली. दरम्यान, भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी संदेश पारकर गटाला पूर्ण समर्थन दिले, तर या निवडणुकीत काँग्रेसच्या मावळत्या नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांचे मत निर्णायक ठरले.
राजकीय वैर विसरून पद
संदेश पारकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना राणे विरुद्ध पारकर यांच्यात वेळोवेळी टक्कर व्हायची. मात्र, दोन वर्षांपूर्वी आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकाराने संदेश पारकर यांनी नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राणे यांनी जुने सर्व राजकीय वैर विसरून त्यांची कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदी वर्णीही लावली होती.

Web Title: Kankavalit Rana Push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.