तानसेनांबरोबरच कानसेनचा ध्यास

By Admin | Published: February 10, 2017 09:35 PM2017-02-10T21:35:11+5:302017-02-10T21:35:11+5:30

संगीत रसिक एकवटले : आशियेत गंधर्व मासिक शास्त्रीय संगीत सभा

Kansen's obsession with Tansena | तानसेनांबरोबरच कानसेनचा ध्यास

तानसेनांबरोबरच कानसेनचा ध्यास

googlenewsNext

कणकवली : कणकवली शहरासह परिसरात गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय गायनाबरोबरच सांगीतिक चळवळ सुरूआहे. या चळवळीच्या माध्यमातून अनेक गायक-गायिकाही तयार झाले आहेत. या चळवळीचा पुढचा टप्पा म्हणून ‘तानसेनांबरोबरच कानसेन’ तयार करण्याचा ध्यास मनी ठेवून येथील ‘गंधर्व परिवाराच्या’ पुढाकारातून संगीत रसिक एकवटले
आहेत.
या संगीत प्रेमींनी दर महिन्याच्या एका विशिष्ट दिवशी एकत्र येऊन ‘गंधर्व मासिक शास्त्रीय संगीत सभा’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. या शास्त्रीय संगीत सभेत गायन, वादन, नृत्य या कलांचे शास्त्रीय परिभाषेच्या अंगाने सादरीकरण होणार आहे.
सध्याच्या बदलत्या काळात संगीताच्या बाबतीत रसिकांची आवड तसेच निवडही बदलत असली तरी शास्त्रीय संगीत ऐकण्यास उत्सुक असलेले दर्दीही काही कमी नाहीत. त्यामुळे कणकवलीसारख्या शहरात अनेक शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होत असतात.
या कार्यक्रमांना उपस्थित राहून कलाकारांना दाद देणारेही खूप असतात. मात्र, त्यापैकी फारच कमी लोकांना आपण ऐकलेले नेमके काय होते, हे सांगता येते. त्यामुळे शास्त्रीय संगीत चळवळ पुढे नेताना दर्दी श्रोत्यांच्या संगीतविषयक उपजत ज्ञानात भर टाकून चांगले ‘कानसेन’ तयार करणे ही काळाची गरज बनली आहे. असे झाले तर गुणवंत कलाकारांच्या कलेची पारख होऊ शकेल आणि कला सादर करणाऱ्यांना तसेच ऐकणाऱ्यांनाही निखळ आनंद मिळू शकेल.
हे लक्षात घेऊन कणकवलीतील संगीत रसिकानी ‘गंधर्व मासिक शास्त्रीय संगीत सभा’ दर महिन्याला आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या शास्त्रीय संगीत सभेचे पहिले पुष्प आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे संगीत विशारद बाळासाहेब नाडकर्णी यांनी मंगळवारी गुंफले. त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत शास्त्रीय गायन केले. तसेच शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन व संगीत कसे ऐकावे ? याबाबत मार्गदर्शनही केले.
त्यांना तबला साथ गुरुदास केळुसकर व गिरीश कामत यांनी केली, तर संवादिनी विजयकुमार कात्रे, व्हायोलीन अरुण दाभोलकर व तानपुरा साथ प्रियंका मुसळे, संतोष सुतार यांनी केली.
या कार्यक्रमाला गंधर्व परिवाराचे अभय खडपकर, मनोज मेस्त्री, अमोल परब, सागर महाडिक, मिलिंद करंबेळकर, किशोर सोगम, आशिये दत्त क्षेत्राचे विलास खानोलकर, पांडुरंग बाणे, डॉ. करंबेळकर, प्रा. हरिभाऊ भिसे, आदी यावेळी उपस्थित होते.


२५ ला दुसरे पुष्प !
या गंधर्व मासिक शास्त्रीय संगीत सभेचे दुसरे पुष्प २५ फेब्रुवारीला आशिये येथील श्री दत्त क्षेत्री गुंफले जाणार आहे.

Web Title: Kansen's obsession with Tansena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.