भर पावसात पोल उभा करुन सुरु केला कानूरचा वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 04:53 PM2020-08-08T16:53:46+5:302020-08-08T16:58:51+5:30
कोल्हापूर - भर पावसात विजेचा पोल उभा करुन, तुटलेल्या तारांना महापुरात जाऊन जोड देत महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी चंदगड तालुक्यातील ...
कोल्हापूर- भर पावसात विजेचा पोल उभा करुन, तुटलेल्या तारांना महापुरात जाऊन जोड देत महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी चंदगड तालुक्यातील कानूरसह कुरणी, पुंद्रा, बुजवडे आदी गावांचा वीजपुरवठा शुक्रवारी (दि.7) सायंकाळी पूर्ववत केला असून, महावितरणच्या या कर्मचाऱ्यांचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.
मंगळवारी (दि. 4) रात्री अकरा वाजेच्या सुमारास चंदगड तालुक्यातील कानूर उपकेंद्राला महापारेषणच्या हलकर्णी उपकेंद्रातून येणारा 33 केव्ही वीजपुरवठा ठप्प झाला. परिणामी कानूर 33/11 केव्ही उपकेंद्रावर अवलंबून असणाऱ्या गावातील वीज वितरण ठप्प झाले होते.
ही वाहिनी साधारणत: 12 किमी लांबीची असून, या मार्गात भाताची व उसाची शेती केली जाते. त्यामुळे या वाहिनीची पेट्रोलिंग करण्यासाठी प्रत्येक पोल व त्यावरील चिनीमातीचे इन्सूलेटर (चिमणी) तपासण्यात वेळ गेला. एका ठिकाणी वीज वाहिनी खांबावरुन खाली पडली होती. ती दुरुस्त करुन गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास कानुर वीज उपकेंद्राला येणारा वीज पुरवठा पूर्ववत झाला.
कानूर उपकेंद्र चालू झाले. मात्र उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या 11 केव्ही कुरणी वाहिनीचा वीजपुरवठा सुरु झाला नव्हता. वीज कर्मचाऱ्यांनी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. दोन ठिकाणी चिनीमातीचे इन्सूलेटर फुटलेले सापडले. ते बदलले. तर पुढे पुंद्रा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत या वाहिनीवरील एक लोखंडी पोल कोसळला होता व त्याच्या तारा घटप्रभा नदीच्या महापुराच्या फुगवट्यात पडल्या होत्या.
भर पावसात पोल उभा करणे सोपे काम नव्हते. परंतु, ग्रामस्थांच्या मदतीने भर पावसात पोल उभा केला. कर्मचाऱ्यांनी पुरातील तार शोधून जोडली आणि कुरणी वाहिनी शुक्रवारी (दि.7) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पूर्ववत झाली. या वाहिनीवरील सर्व गावांचाही वीजपुरवठा सुरु करण्यात यश मिळाले.
चंदगडचे उपकार्यकारी अभियंता विशाल लोधी, चंदगड-1चे शाखा अभियंता रविंद्र रेडेकर यांचेसह जनमित्र नामदेव घोडे, विलास मुर्ती, बाळू खराडे व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी योगेश गावडे, भेरट तेजम व तुकाराम इंगळे यांनी काम केले.
एनडीआरएफच्या मदतीने गांधीनगरचा वीजपुरवठा पूर्ववत
तावडे हॉटेलजवळील एका खांबावर बिघाड झाल्याने गांधीनगर वीज उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा शनिवारी रात्री 8 च्या सुमारास बंद पडला होता. बिघाड झालेल्या खांबाच्या सभोवती महापुराचे पाणी असल्याने पोलपर्यंत जाण्यासाठी बोटची गरज होती.
एनडीआरएफच्या तुकडीने बोटीने वीज कर्मचाऱ्यांना पोलपर्यंत नेले. तिथे पोलवर चढून तांत्रिक बिघाड काढून उचगाव फिडरवरुन गांधीनगरचा वीजपुरवठा सुरु करण्याचे काम गांधीनगरचे शाखा अभियंता अतुल सुतार, उचगांवचे शाखा अभियंता रघुनाथ लाड, वीज कर्मचारी प्रकाश फराकरे, किरण कोळी, महेश बेंद्रे, नितीन कांबळे, संजय माणगावे व सुनील खटावकर यांनी केले आहे.