कोल्हापूर : ‘राजारामपुुरी’ला लवकरच कायमस्वरूपी, सक्षम पोलीस निरीक्षक देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 04:59 PM2019-01-15T16:59:57+5:302019-01-15T17:04:27+5:30
राजारामपुरी पोलीस ठाण्याला लवकरच कायमस्वरूपी, सक्षम पोलीस निरीक्षक देऊ, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले.
कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्याला लवकरच कायमस्वरूपी, सक्षम पोलीस निरीक्षक देऊ, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले.
राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी व सक्षम पोलीस निरीक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी राजारामपुरी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे अभिनव देशमुख यांच्याकडे केली. त्यावेळी ते बोलत होते. याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी पोलीस ठाण्याला तत्कालीन पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्यासारखे सक्षम अधिकारी असल्याने गुन्हेगारीला चाप व अवैध धंद्यांना आळा बसला होता. त्यामुळे गुन्ह्याचा आलेख कमी झाला होता; पण त्यांची बदली झाल्यानंतर या पोलीस ठाण्यात एकही सक्षम अधिकारी नाही. याचा परिणाम पुन्हा एकदा गुन्हेगारीने व अवैध धंद्यांने डोके वर काढले आहे.
मध्यंतरी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची नियुक्ती केली गेली. त्यांनीही गुन्हेगारीला आळा घातला; परंतु त्यांचीही बदली करण्यात आली. त्यामुळे या पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी, सक्षम पोलीस निरीक्षकाची नेमणूक करावी व त्याचा कार्यकाल दोन वर्षे असावा. तरच येथील गुंडगिरी व काळेधंदे बंद होतील.
यावेळी देशमुख म्हणाले, लोकसभा निवडणुकीमुळे येथील बऱ्याच अधिकाºयांची बदली होणार आहे. त्यामुळे बाहेरूनही पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी याठिकाणी येणार आहेत. त्यातील एकाची पोलीस निरीक्षक म्हणून या पोलीस ठाण्यात नियुक्ती करू.
यावेळी अनिल घाटगे, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, मदन जाधव, अमरसिंह निंबाळकर, रणजित घाटगे, अनुप पाटील, काका पाटील, प्रशांत डवरी, संग्रामसिंह निंबाळकर, आदी उपस्थित होते.