करंजफेण ते धनगरवाडा रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:42+5:302021-04-20T04:26:42+5:30
ठेकेरदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क अणूस्कुरा : शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण ते धनगरवाडा दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ...
ठेकेरदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अणूस्कुरा :
शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण ते धनगरवाडा दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची चौकशी करण्याची मागणी सरपंच पृथ्वीराज खानविलकर व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
करंजफेण ते करंजफेण धनगरवाडा या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम मार्च २०१९ मध्ये सुरू झाले असून या रस्त्यासाठी दोन कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची तारीख जानेवारी २०२० मध्ये संपली असतानाही एक वर्ष चार महिने उलटले तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. सध्या खडीकरण व कारपेटचे काम पूर्ण झाले पण खूप कमी प्रमाणात डांबर वापरल्याने आठ दिवसातच खडी वर आली आहे. तसेच रस्त्याच्या साईडपट्टीसाठी मुरूमऐवजी मातीचा वापर केला आहे. मोरीचे बांधकाम अतिशय निकृष्ट झाले असून त्या आताच ढासळत आहेत. त्याचबरोबर इस्टिमेटमधील ५०० मीटर रस्ता कमी केला आहे. संबंधित ठेकेदारांना ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही कामाबाबत हयगय दिसून येत आहे. गेले दोन पावसाळे सुरू असलेले हे काम या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल का? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.