करात आघाडी, सुविधात पिछाडी

By admin | Published: January 2, 2015 11:30 PM2015-01-02T23:30:07+5:302015-01-03T00:13:12+5:30

नगरसेवकांचा जनसंपर्कावर भर : सर्वाधिक अधिभार भरूनही सुविधेपासून वंचित, ड्रेनेजची वानवा

Karate Front | करात आघाडी, सुविधात पिछाडी

करात आघाडी, सुविधात पिछाडी

Next

सर्वाधिक सांडपाणी अधिभार भरणारा प्रभाग म्हणून रुईकर कॉलनी या प्रभागाकडे पाहिले जाते; परंतु अद्याप या ठिकाणी ड्रेनेजची सुविधाच महापालिकेने केलेली नाही. विद्यमान नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यात फरक पडलेला नाही. नगरसेवक प्रकाश पाटील यांचा या प्रभागात नित्य संपर्क असून सुविधांबाबतही ते कमालीचे दक्ष असल्याचे दिसत आहे. तरीही तुंबलेल्या गटारी, डासांचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग असे प्रश्न या प्रभागात दिसत आहेत.
उच्चभ्रू, मध्यमवर्गीय व कष्टकरी यांचा समावेश असलेल्या रुईकर कॉलनी प्रभागात रुक्मिणीनगर, लक्ष्मीनगर, दत्त कॉलनी, माकडवाला वसाहत, विलास कॉलनी येते. प्रभागात फिरल्यावर रस्ते, गटारी व अंतर्गत स्वच्छता वेळेवर असल्याचे दिसले. कचरा उठावाची व्यवस्था आहे तरीही कचऱ्याचे ढीग अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून येते. इतर प्रभागांच्या तुलनेत सर्वाधिक सांडपाणी अधिभार हा या प्रभागातून दिला जातो; परंतु अद्याप रुईकर कॉलनी परिसरात ड्रेनेज लाईनची सुविधा नाही. त्यामुळे डासांचे साम्राज्य पसरले असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मैला वाहून नेण्यासाठी पैसे भरून गाडी बोलवावी लागत असल्याची परिस्थिती आहे. रुईकर कॉलनीमध्ये बहुतांश रस्त्यांची स्थिती चांगली आहे. काही ठिकाणी रस्ते खड्डेमय झाले आहेत. या परिसरात निघणारी बांधकामे यासाठी कारण असल्याचे सांगण्यात येते. बांधकाम सुरू झाल्यानंतर वर्ष ते दोन वर्ष ते चालू असते; त्यामुळे या ठिकाणी नेहमी रस्त्यावर पाणी वाहते; त्यामुळे रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. येथील उद्यानाची परिस्थिती चांगली आहे. तेथे नियमित स्वच्छता होते. त्याचबरोबर मैदानाची देखरेखही चांगली ठेवण्यात आली आहे. नागरिकांना फिरण्यासाठी मैदानाभोवती ट्रॅक असून प्रकाशाची व्यवस्था केल्याने रात्रीही नागरिक या ठिकाणी फिरायला येतात.
माकडवाला वसाहत ही सुमारे ९०० लोकवस्तीची झोपडपट्टी आहे. या वसाहतीमध्ये स्वच्छता आणि सुविधांबाबत नगरसेवकांचे चांगले लक्ष आहे. औषध फवारणी, रस्ते व गटारी स्वच्छतेसाठी दररोज महापालिकेचे कर्मचारी येतात. पिण्याच्या पाण्याची काही अडचण नाही. दिवसातून दोन वेळा येथे पाणी येते. ऐपतीप्रमाणे नगरसेवकांनी येथील नागरिकांना पाण्याची कनेक्शन्स दिली आहेत. रुक्मिणीनगर येथे रस्त्यांची स्थिती, कचरा उठाव, पिण्याचे पाणी याबाबत नागरिकांकडून नगरसेवकांबाबत समाधानाच्या प्रतिक्रिया आहेत. पण येथील उद्यानाची दुर्दशा झाली आहे. हे उद्यान सध्या येथील एका मंडळाने देखभालीसाठी घेतले आहे; परंतु अस्वच्छता आणि पुरेशा सुविधा न केल्याने त्याची अवस्था दयनीय आहे. प्रभागात घंटागाडीची व्यवस्था आहे. त्यामुळे कचरा उठावाबाबत तक्रारी कमी आहेत. जनसंपर्क आणि सुविधा देण्याच्या पातळीवर नगरसेवकांची चांगली प्रतिमा आहे. तरीही प्रभागात सर्वच आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. काही ठिकाणी उघड्या गटारी, डासांचे साम्राज्य, कचऱ्यांचे ढीग हे आहेतच. यामुळे अस्वच्छतेचे चित्र काही प्रमाणात आहे. ‘नगरोत्थान’मधील रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. कधी काम सुरू, तर कधी बंद अशी त्यांची परिस्थिती आहे.

प्रभागातील जवळपास ९० टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. रुक्मिणीनगर कमान ते शहा बंगला रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. त्याशिवाय निंबाळकर कॉलनीतील रस्ताही मंजूर झाला असून त्याचे टेंडरही निघाले आहे. मतदार संघात सकाळी उठल्यापासून आपला नागरिकांशी संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी सहज लक्षात येतात. त्यानुसार आपण पुढील कार्यवाही करत असतो. भागात घंटागाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. - प्रकाश पाटील, नगरसेवक



विकासकामांचा दावा
माकडवाला वसाहतीमध्ये रस्ते कॉँक्रीटीकरण
आमदार निधीतून संभाजी महाराज पुतळा ते दिघे बंगला डांबरी रस्ता
महापालिका निधीतून बुले बंगला ते शिवम बेकरी डांबरी रस्ता
माकडवाला वसाहत येथे गटारीचे काम
कॉलनीत मैदानाभोवती अ‍ॅक्युपंक्चर फरशी
नगरोत्थानमधील वायचळ पथ, दत्तमंदिर रोड, दत्त कॉलनी येथील कामे सुरू आहेत.



प्रमुख समस्या
अस्वच्छतेमुळे डासांचे साम्राज्य
ड्रेनेजची सुविधा नाही
तुंबलेल्या गटारी
नगरोत्थान प्रकल्पाची रखडलेली कामे

Web Title: Karate Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.