कर्मवीर अण्णा हे कणबरकरांचे दिशादर्शक : एन. डी. पाटील

By admin | Published: April 13, 2017 05:21 PM2017-04-13T17:21:39+5:302017-04-13T17:21:39+5:30

रयत शिक्षण संस्था ‘प्राचार्य आर. के. कणबरकर’ पुरस्काराने सन्मानित; शिवाजी विद्यापीठात पुरस्कार वितरण

Karmaveer Anna is the guide of Kanabkar: N. D. Patil | कर्मवीर अण्णा हे कणबरकरांचे दिशादर्शक : एन. डी. पाटील

कर्मवीर अण्णा हे कणबरकरांचे दिशादर्शक : एन. डी. पाटील

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १३ : खेड्यापाड्यांतील अनेक रत्ने, सुगंधित फुलांना गोळा करून कर्मवीर अण्णांनी ‘रयत’ची उभारणी केली. यामध्ये नेकदार आणि सरळ स्वभावाचे माजी कुलगुरू डॉ. रा. कृ. कणबरकर यांचा समावेश होता. अण्णा हे त्यांचे शैक्षणिक कार्याबाबतचे दिशादर्शक होते, असे प्रतिपादन ‘रयत’चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी गुरुवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठातर्फे साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेला ‘प्राचार्य आर. के. कणबरकर’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठातील या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. हा पुरस्कार कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रा. पाटील व ‘रयत’चे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांना प्रदान करण्यात आला. एक लाख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील कार्यक्रमास माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एन. जे. पवार, सरोज पाटील, शालिनी कणबरकर, व्ही. एम. चव्हाण, आदी प्रमुख उपस्थित होते.

प्रा. पाटील म्हणाले, कर्मवीर अण्णांनी खेड्यापाड्यांतील मातीतून रत्ने गोळा करून ‘रयत’द्वारे समतेची रचना केली. कोणताही शिक्षण ग्रंथ न वाचता शैक्षणिक क्षेत्रात नवे प्रयोग त्यांनी घडवीत महाराष्ट्राचा चेहरा बदलला. शिक्षणतज्ज्ञांचे ते महर्षी होते. अण्णांनी बेळगावमधून डॉ. कणबरकर यांना ‘रयत’मध्ये आणले. अण्णांच्या शैक्षणिक यज्ञात कणबरकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘रयत’मध्ये येण्याचा कणबरकर यांचा निर्णय त्यांच्या कार्याला व्यापक दिशा देणारा ठरला.

अध्यक्ष डॉ. पाटील म्हणाले, अण्णांनी ‘रयत’च्या माध्यमातून समाजातील तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविली. अण्णांचा विचार आणि भविष्यातील शैक्षणिक आव्हानांचा वेध घेऊन ‘रयत’ची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत आज विद्यापीठाने डॉ. कणबरकर यांच्या नावाच्या पुरस्काराने केलेला सन्मान हा अनेक पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे. अण्णांना अपेक्षित असलेले विद्यापीठ, क्लस्टर युनिव्हर्सिटी उभारण्याचे आमचे ध्येय आहे.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, १५ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘रयत’च्या कार्यक्षेत्रात शिवाजी विद्यापीठ असल्याचा अभिमान आहे. ‘रयत’ ही नवसमाजाची रचनाकार संस्था असून, ती विद्यापीठाच्या संकल्पनेपेक्षा पुढे कार्यरत आहे. प्राचार्य कणबरकर पुरस्काराद्वारे श्रम, शिक्षणाचा संस्कार असलेल्या ‘रयत’चा गौरव करण्याचा सन्मान विद्यापीठाला मिळाला आहे.

कार्यक्रमास डॉ. अरुण कणबरकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, बी. पी. साबळे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, आदींसह शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य बी. ए. खोत यांनी स्वागत केले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मानपत्र वाचन केले. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

नवविचारांना सामोरा जाणारा योद्धा

डॉ. कणबरकर यांच्यासमवेत विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये काम करण्याचे मला भाग्य लाभले होते. त्यांनी मला वडीलबंधूप्रमाणे प्रेम दिल्याचे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, कणबरकर हे सरळमार्गी, तर मी चळवळी होतो; पण त्यांच्या आणि माझ्यातील साम्याचा एक घटक ‘राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श’ हा होता. कणबरकर हे नव्या विचाराला त्याच दमाने सामोरे जाणारे योद्धे होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा विद्यापीठ व कणबरकर कुटुंबीयांचा उपक्रम विधायक आहे.

लढण्यासाठीची प्रेरक शक्ती

सध्या ज्ञानाला विज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. ते लक्षात घेऊन शेती, तंत्रज्ञान, आरोग्य, कौशल्य विकास असे विविध क्षेत्रांत नवनवीन उपक्रम, अभ्यासक्रमांद्वारे ‘रयत’ची एक वेगळे विद्यापीठ स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे अध्यक्ष डॉ. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, शासन आज शिक्षणावर फारसा खर्च करीत नाही, मग ‘प्रगत महाराष्ट्र’ कसा होणार? पैसे असणाऱ्यांनाच चांगले शिक्षण मिळत असल्याचे वास्तव आहे. अशा स्थितीत भविष्यात शिक्षणासाठी चौथी लढाई होणार आहे. सर्वसामान्यांसाठी ‘रयत’ही लढाई लढणार आहे. यासाठी हा पुरस्कार आम्हाला प्रेरक शक्ती ठरणार आहे.
 

Web Title: Karmaveer Anna is the guide of Kanabkar: N. D. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.