‘कर्मवीर रावसाहेब डी. आर. भोसले’ चरित्र ग्रंथाचे गुरुवारी प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:20+5:302021-03-16T04:25:20+5:30
कोल्हापूर : प्राचार्य डॉ. विलास पोवार लिखित ‘कर्मवीर रावसाहेब डी. आर. भोसले चरित्र व कार्य’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी ...
कोल्हापूर : प्राचार्य डॉ. विलास पोवार लिखित ‘कर्मवीर रावसाहेब डी. आर. भोसले चरित्र व कार्य’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनात होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक वसंत भोसले, तर इतिहास संकलन समितीचे अध्यक्ष डॉ. डी. बी. खणे, विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख डॉ. अरुण भोसले प्रमुख उपस्थित असतील. कर्मवीर रावसाहेब डी. आर. भोसले यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. नाशिक येथे फौजदार म्हणून रूजू झाल्यानंतर तेथे त्यांनी सत्यशोधक समाज, मराठा विद्याप्रसारक समाज स्थापन करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. कोल्हापुरात शिक्षणाधिकारी पदावर काम करताना त्यांनी कोल्हापूर गव्हर्नमेंट सर्व्हंट को-ऑपरेटिव्ह बँक, प्राथमिक शिक्षक बँक, मराठा बँक, कोल्हापूर न्यूजपेपर असोसिएशन, मराठा महिला वसतिगृह, कोल्हापूर कन्झ्युमर्स स्टोअर्स, कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघ, आदी संस्थांच्या स्थापनेत मोलाचे सहकार्य केले. छत्रपती शाहूंच्या निधनानंतर त्यांच्या पुरोगामी विचारांची ज्योत तेवत ठेवणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये डी. आर. भोसले यांचे कार्य मोलाचे असल्याची माहिती प्राचार्य डॉ. पोवार यांनी दिली.
फोटो (१५०३२०२१-कोल-कर्मवीर रावसाहेब भोसले)