कर्णसिंह गायकवाड यांच्या विजयाने गटाला उभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:24 AM2021-05-06T04:24:05+5:302021-05-06T04:24:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी आघाडीकडून काँग्रेसचे युवा नेते कर्णसिंह गायकवाड यांच्या झालेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी आघाडीकडून काँग्रेसचे युवा नेते कर्णसिंह गायकवाड यांच्या झालेल्या विजयामुळे माजी आमदार संजयसिह गायकवाड गटाला पंधरा वर्षांनंतर विजयाचा गुलाल लागला आहे. विधान सभेला आमदार विनय कोरे यांना कर्णसिंह गायकवाड यांनी केलेल्या मदतीचा पैरा विनय कोरे यांनी फेडला आहे.
शाहूवाडी तालुक्याच्या राजकारणावर माजी आमदार स्वर्गीय संजयसिंह गायकवाड यांचे जबरदस्त राजकीय वर्चस्व राहिले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांनी पाच वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले. तेथून माजी आमदार सत्यजित पाटील निवडून आले. त्यांनी आपल्या मातोश्री अनुराधा पाटील यांना गोकुळचे संचालक पद दोन पंचवार्षिक मिळवून देण्यात यशस्वी झाले. त्यामुळे कर्णसिंह गायकवाड याचा गट पंधरा वर्षे राजकीय वनवासात राहिला. गोकुळचे माजी संचालक आनंदराव पाटील यांनी पंधरा वर्षे गोकुळचे संचालक पद भूषवून तालुक्यात गोकुळच्या माध्यमातून धवल क्रांती केली. तर माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांनी आमदारकीच्या माध्यमातून हरित क्रांती केली आहे. मात्र, आजही आनंदराव पाटील भेडसगावकर गट उपेक्षित आहे.
गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या मातोश्री गोकुळमध्ये संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत ही सत्ताधारी आघाडीकडून त्यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून पुन्हा एकदा त्यांना संधी दिली होती. तर अनेक वेळा पराभवाला सामोरे जाऊनही दिवंगत माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांची विचारधारा जपत आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवणाऱ्या कर्णसिंह गायकवाड यांना विरोधी राजश्री शाहू शेतकरी आघाडीने संधी दिली यात कर्णसिंह गायकवाड यांना गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून मिळालेले संचालक पद हे त्यांच्या गटाला नवी उभारी देईल.
अनुराधा पाटील यांच्यासाठी माजी आमदार सत्यजित पाटील यांनी यंत्रणा गतिमान केली होती. तर विरोधी आघाडीकडून विद्यमान आमदार विनय कोरे यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांनीही आपली यंत्रणा सक्रिय करून मतदारांपर्यत संदेश पोहोचवला होता.