कर्नाटकाच्या नेत्यांच्या निवडणुका रंगतदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:13 AM2018-04-26T01:13:10+5:302018-04-26T01:13:10+5:30
वसंत भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र काल, मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जवळजवळ स्पष्ट झाले. एकाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी आता प्रचाराचा धुरळा उडणार असून, सर्वच पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या लढती रंगतदार होणार आहेत.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या नवव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी यावेळी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याचा निर्णय अखेरच्या दिवशी घेतला. म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा हा त्यांचा सध्याचा विधानसभा मतदारसंघ आहे. शिवाय त्यांनी पाचवेळा म्हैसूर शहराजवळील चामुंडेश्वरी मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. येत्या निवडणुकीत त्यांनी याच मतदारसंघाची निवड केली आहे. चामुंडेश्वरी मतदारसंघातून त्यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघाचे सध्या जनता दलाचे जी. टी. देवेगौडा प्रतिनिधित्व करीत आहेत. सिद्धरामय्या यांनी १९८३ पासून पाचवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बागलकोट जिल्ह्यातील बदामी मतदारसंघातूनही निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. या मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय
दलित आणि मुस्लिम समाजाची मते अधिक आहेत. चामुंडेश्वरी मतदारसंघापेक्षा अधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून त्यांनी बदामीची निवड केली आहे.
भाजपने सिद्धरामय्या यांना जोरदार टक्कर देण्यासाठी बेळ्ळारीचे खासदार बी. श्रीरामलु यांना बदामीतून अखेरच्या क्षणात रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. श्रीरामलु हे दलित समाजात लोकप्रिय
आहेत. शिवाय बेळ्ळारीच्या खाणसम्राट रेड्डी बंधूंचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी बदामीशिवाय चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोलाकालमुरू मतदारसंघातून अर्ज दाखल
केला आहे. तो कदाचित मागे घेण्यात येईल.
म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा मतदारसंघात सिद्धरामय्या यांचे चिरंजीव डॉ. यतिंद्रा निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून बी. एस. येडीयुराप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. विजेंद्र यांना उमेदवारी देण्याचा निर्णय अखेर
झाला नाही. विजेंद्र यांच्या समर्थकांनी प्रचंड निदर्शने केली. अखेरीस पोलिसांना लाठीचार्ज करावा
लागला होता. ही लढत रंगतदार होणार आहे.
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार जगदीश शट्टर हे सहाव्यांदा हुबळ्ळी-धारवाड (मध्य) मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात कॉँग्रेसने प्रसिद्ध सर्जन डॉ. महेश नलवाड यांना उतरविले आहे. मागील निवडणुकीत डॉ. नलवाड यांचा १८ हजार मताने पराभव झाला होता.
कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदाचे इच्छुक उमेदवार जी. परमेश्वरा हे पुन्हा एकदा तुमकूर जिल्ह्यातील कोराटगेरे राखीव मतदारसंघातून रिंगणात आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा जनता दलाचे सुधाकरलाल यांनी १८ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र, पक्षातील वजनदार दलित नेता आणि प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. आता मुख्यमंत्रिपदासाठी मला निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले आहे. भाजपने जिल्हा परिषदेचे सदस्य वाय. एस. हुचय्या यांना उमेदवारी दिली आहे.
येडीयुराप्पा नवव्यांदा निवडणूक रिंगणात
भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुराप्पा नवव्यांदा शिमोगा जिल्ह्यातील शिक्रापुरा मतदारसंघातून लढत देत आहेत. त्यांनी या मतदारसंघाचे सातवेळा प्रतिनिधित्व केले आहे. एकदा त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या विरोधात कॉँग्रेसचे गोनी मालथेश उभे आहेत. येडीयुराप्पा सध्या शिमोग्याचे खासदार आहेत, तर त्यांचे चिरंजीव बी. वाय. राघवेंद्र हे शिक्रापुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.