Karnataka Assembly Elections-- तिरंगी लढतीचा लाभ कॉँग्रेसला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:22 AM2018-05-12T01:22:22+5:302018-05-12T01:22:22+5:30

कर्नाटकाच्या दक्षिण आणि किनारपट्टीवरील जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची लढत प्रामुख्याने तिरंगी राहणार आहे. शिवाय बंगलोर, म्हैसूर, मंगलोर या मोठ्या शहरांचाही यामध्ये समावेश आहे.

Karnataka Assembly Elections - Congress to benefit from tri-match? | Karnataka Assembly Elections-- तिरंगी लढतीचा लाभ कॉँग्रेसला?

Karnataka Assembly Elections-- तिरंगी लढतीचा लाभ कॉँग्रेसला?

googlenewsNext
ठळक मुद्देदक्षिण कर्नाटक -- सुपीक, सधन आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील विभाग

वसंत भोसले।
कर्नाटकाच्या दक्षिण आणि किनारपट्टीवरील जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची लढत प्रामुख्याने तिरंगी राहणार आहे. शिवाय बंगलोर, म्हैसूर, मंगलोर या मोठ्या शहरांचाही यामध्ये समावेश आहे. कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटात विस्तारलेल्या सहा जिल्ह्यांत ३३ मतदारसंघ आहेत, तर उर्वरित जुन्या म्हैसूर प्रांतातील बारा जिल्ह्यांत १०१ जागा आहेत. हा सर्वांत सुपीक, सधन आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील विभाग आहे.

उत्तर कर्नाटकातील ९० पैकी ५४ जागा जिंकून सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारला १२२ सदस्यांचे पाठबळ होते. त्यामध्ये दक्षिण आणि किनारपट्टीतील ६४ आमदारांचा समावेश होता. कोकण किनारपट्टीत कारवारपासून मंगलोर आणि घाट मध्यावरील शिमोगा, चिक्कमंगळुरू, आदी सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. कर्नाटकातील नैसर्गिक साधनसामुग्रीने संपन्न, सुंदर असलेल्या या विभागात ३३ पैकी सत्तरा जागा कॉँग्रेसने जिंकल्या होत्या. भाजपने सात, तर जनता दलास सहा जागा मिळाल्या होत्या. '

हा सर्व विभाग धार्मिक सलोख्याच्या मुद्द्यावरून धुमसतो आहे. विशेषत: कोकण किनारपट्टीवर नेहमीच धार्मिक विद्वेषाचे राजकारण होत आलेले आहे. भाजप सत्तेवर असताना धार्मिक असहिष्णुतेच्या अनेक घटना होत्या. त्याचा फटका भाजपला बसला आणि कॉँग्रेसने बाजी मारली होती. भाजपला केवळ सातच जागा जिंकता आल्या होत्या. येडियुराप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाला केवळ त्यांची स्वत:ची एकच जागा (शिकारीपुरा) मिळाली होती.

म्हैसूर, मंड्या, हासन, चामराजनगर, चिकमंगळुरू, तुमकुरू, चित्रदुर्गा, कोलार, बंगलोर ग्रामीण, चिक्कबल्लपुरा, आदी जिल्ह्यांत मुख्य लढत कॉँग्रेस विरुद्ध जनता दल अशी झाली होती. या निवडणुकीतही हेच वातावरण आहे. जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे वक्कलिंगा समाजावर प्रभुत्व आहे. या सर्व जिल्ह्यांतील शेती करणारा हा समाज देवेगौडा यांच्या पाठीशी उभा राहतो. त्याचवेळी कॉँग्रेस पक्षाचादेखील प्रभाव या विभागात आहे. वक्कलिंगाबरोबरच दलित आणि अल्पसंख्याक समाज कॉँग्रेसबरोबर राहतो. शिवाय भाजपचे शहरी विभागात प्राबल्य असल्याने या विभागातील निवडणूक तिरंगी होत आहे.

बंगलोर शहरात आणि उपनगरांत अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी अकरा ठिकाणी कॉँग्रेसला यश मिळाले होते. अकरा जागा भाजपने जिंकल्या होत्या. बंगलोर शहर, जिल्हा आणि उपनगर हा निर्णायक निकाल देणारा विभाग आहे. कर्नाटकचा मध्य विभाग म्हणून मानला जातो, त्यात दावणगेरे, चित्रदुर्ग, चिक्कबल्लपुरा, तुमकूर, आदी जिह्यांचा समावेश आहे. येथे तिरंगी लढत आहे. कॉँग्रेस आणि भाजपला जनता दलाशी सामना करावा लागत आहे. म्हैसूर, मंड्या, हासन, चामराजनगर, रामनगरा जिल्ह्यांत कॉँग्रेस विरुद्ध जनता दल अशीच प्रमुख लढत होत आहे.

दक्षिण कर्नाटक आणि कोकण किनारपट्टीवर १३४ जागांपैकी जुन्या म्हैसूर प्रांतात १०१ जागा आहेत. त्यापैकी ५१ जागा कॉँग्रेसने, तर ३९ जागा जनता दलाने जिंकल्या होत्या. भाजपला केवळ पंधरा जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी बंगलोर शहरातील अकरा होत्या. बंगलोर शहर वगळता भाजपला दक्षिण कर्नाटकात यश मिळाले नव्हते. मुख्य लढत जनता दल विरुद्ध कॉँग्रेस अशी होती.

या निवडणुकीतही हेच चित्र दिसते आहे. भाजपची स्थिती सुधारली तर कॉँग्रेसला फटका बसू शकतो आणि जनता दलाची किंगमेकरची भूमिकाही मवाळ होऊ शकते. उत्तर कर्नाटकाप्रमाणेच दक्षिण कर्नाटकाचे मतदार निर्णायक भूमिका घेणार आहेत. कावेरी नदीच्या खोऱ्यातील हा बहुतांश सुपीक प्रदेश कॉँग्रेस आणि जनता दलाची लढाई पाहतो आहे. बंगलोर शहरातील वातावरण भाजपच्या बाजूने आणि ग्रामीण दक्षिण कर्नाटकाचे कॉँग्रेसच्या बाजूने आहे. त्यात जनता दलाच्या यशावर कर्नाटकाचे सत्ताकारण निश्चित होणार आहे.


दक्षिण कर्नाटक
एकूण जिल्हे १८
मतदारसंघ १३४
कॉँग्रेस ६८
भाजप २२
जनता दल ३४
कर्नाटक जनता ०१
इतर ०९

 

Web Title: Karnataka Assembly Elections - Congress to benefit from tri-match?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.