Karnataka Assembly Elections - विजयाचा निर्णायक दुरंगी सामना उत्तर कर्नाटक : सर्वाधिक जागा जिंकणाऱ्याला विधानसौधचा मुकुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 11:58 PM2018-05-09T23:58:56+5:302018-05-09T23:58:56+5:30
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान होण्यास आता केवळ दोनच दिवस राहिले आहेत. आरोप-प्रत्यारोप आणि प्रत्येकाने आपली विकासाची संकल्पना मांडून मतदारांना आवाहन केले आहे.
वसंत भोसले ।
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान होण्यास आता केवळ दोनच दिवस राहिले आहेत. आरोप-प्रत्यारोप आणि प्रत्येकाने आपली विकासाची संकल्पना मांडून मतदारांना आवाहन केले आहे. त्यामध्ये उत्तर कर्नाटक हा सर्वांत महत्त्वाचा विभाग मानला जात आहे. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशाच्या सीमेवरील या विभागातील नव्वद मतदारसंघांपैकी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्याला बंगलोरच्या विधानसौधचा मुकुट परिधान करता येणार आहे.
उत्तर कर्नाटकाने आजवर राज्याला सहा मुख्यमंत्री दिले आहेत व राज्याचे राज्यकर्ते कोण असणार याचा कलही ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या निवडणुकीत कर्नाटकात प्रामुख्याने कॉँग्रेसविरुद्ध भाजप अशी सरळ लढत आहे. याउलट दक्षिण कर्नाटक, कोकण कर्नाटक आणि बंगलोर शहर या विभागांतील १३४ जागांवर बहुतांश ठिकाणी धर्मनिरपेक्ष जनता दलामुळे तिरंगी लढती आहेत.
गत निवडणुकीत कॉँग्रेस विरुद्ध भाजप आणि कर्नाटक जनता पक्ष तसेच धर्मनिरपेक्ष जनता दल अशी चौरंगी लढती झाल्या होत्या. कॉँग्रेसच्या विरोधात उत्तर कर्नाटकात भाजप आणि कर्नाटक जनता पक्ष अशा लढतीत कॉँग्रेसने ९० पैकी ५४ जागा जिंकल्या होत्या. भाजपला अठरा, तर कर्नाटक जनता पक्षाने संपूर्ण कर्नाटकात सहा जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी पाच उत्तर कर्नाटकच्या होत्या. जनता दलाची किंगमेकरची भूमिका असणार अशी चर्चा आहे. मात्र, या पक्षाचा प्रभाव खूप मर्यादित आहे. या पक्षाने मागील निवडणुकीत चाळीस जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये उत्तर कर्नाटकाचा वाटा केवळ सहा जागांचा होता.
बेळगावपासून बीदरपर्यंत पसरलेल्या सीमावर्ती उत्तर कर्नाटकात बारा जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. शिवाय या समाजाचे शिक्षण संस्था, धार्मिक संस्था तसेच व्यापार-उद्योगातही प्राबल्य राहिले आहे. लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीवरून कर्नाटकाचे राजकारण ढवळून निघाले आहे. कॉँग्रेस सरकारने गेल्या मार्चमध्ये या समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दलित, अल्पसंख्याक यांच्या अपेक्षा आदींवरूनही सध्या राजकीय कलगीतुरा रंगला आहे. उत्तर कर्नाटकाचे अर्थकारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. सिंचनाची सोय असणारे पट्टे ऊसकरी शेतकºयांचे आहेत आणि उर्वरित मोठा भूभाग हा कोरडवाहू शेतीचा भुईमूग, ज्वारी पिकविणारा आहे. त्यामुळे कर्जमाफीसारखे विषयही चर्चेत आहेत.
भाजपने २००८ मध्ये प्रथम सत्तेवर येताना ११० जागा जिंकल्या होत्या. त्यांपैकी उत्तर कर्नाटकातूनच जिंकलेल्या जागांची संख्या ४९ होती. जवळपास निम्म्या जागा या विभागाने दिल्या होत्या. कॉँग्रेसने १२२ जागा जिंकून सरकार स्थापन करता उत्तरेतून ५४, तर उर्वरित कर्नाटकातील १३४ पैकी ६८ जागा जिंकल्या होत्या. यावेळची निवडणूक उत्तर कर्नाटकात दुरंगी आहे. त्याचा लाभ भाजपला होऊ शकतो. गत निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार बी. एस. येडीयुराप्पा यांनी संपूर्ण कर्नाटकात दहा टक्के मते घेऊन भाजपचा फज्जा उडविला होता. त्यात उत्तर कर्नाटकाचा मोठा वाटा होता.
लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप व कर्नाटक जनता पक्ष एकत्र आले. दुरंगी लढत झाली. तेव्हा कॉँग्रेसला ९० पैकी केवळ अठरा विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले होते. याउलट भाजपला ६२ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळून सर्वाधिक खासदाराही निवडून आले होते. जनता दलास प्रतिसाद मिळाला नव्हता. लिंगायत धर्मास मान्यता आणि येडीयुराप्पा यांच्या रूपाने समाजाला पुन्हा नेतृत्वाची संधी हे कळीचे मुद्दे आहेत. कॉँग्रेसने या विभागात अनेक क्षेत्रात उत्तम काम केले आहे. त्यांचे अनेक उमेदवार मातब्बर आहेत. त्या बळावर मागील निवडणुकीतील यश राखता आले तर कर्नाटकाची सत्ता पुन्हा या पक्षाला मिळेल.
पक्षीय बलाबल
विधानसभा मतदारसंघ ९०
कॉँग्रेस - ५४
भाजप - १८
कर्नाटक जनता - ०५
जनता दल - ०६
इतर - ०७.
उत्तर कर्नाटक एकूण जिल्हे १२