Karnataka Assembly Elections -हवा कॉँग्रेसची; भाजपपुढे खडतर आव्हान अथणी मतदारसंघ : लक्ष्मण सवदी, महेश कुमठळ्ळी यांच्यात जोरदार चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:14 AM2018-05-10T00:14:22+5:302018-05-10T00:14:22+5:30
अथणी : कर्नाटकचे माजी मंत्री, भाजपचे नेते लक्ष्मण सवदी अथणी विधानसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. मात्र, यावेळी कॉँग्रेसचे उमेदवार महेश कुमठळ्ळी यांनी त्यांच्यापुढे खडतर आव्हान
चंद्रकांत कित्तुरे ।
अथणी : कर्नाटकचे माजी मंत्री, भाजपचे नेते लक्ष्मण सवदी अथणी विधानसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. मात्र, यावेळी कॉँग्रेसचे उमेदवार महेश कुमठळ्ळी यांनी त्यांच्यापुढे खडतर आव्हान उभे केले आहे. मतदारसंघात काँग्रेसची हवा दिसत असली तरी पारंपरिक मतपेटीच्या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचा किंबहुना गतवेळपेक्षा यावेळी मताधिक्य वाढण्याचा विश्वास सवदी आणि त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
अथणी मतदारसंघात ११ उमेदवार रिंगणात आहेत. यातील लक्ष्मण सवदी यांनी यापूर्वी भाजपच्याच उमेदवारीवर विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. यावेळी ते चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एक वजनदार नेते म्हणून भाजपमध्ये त्यांचे नाव आहे. राज्यात भाजप सरकारच्या कार्यकालात त्यांना सहकारमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करीत त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. आंबेडकर भवन उभारणी, कोकटनूर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय, गोरगरिबांना घरे, उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून कृष्णा नदीतून पाच टीएमसी पाणी आणणे ही काही त्यांची महत्त्वाची कामे म्हणून सांगता येतील.
कॉँग्रेसचे महेश कुमठळ्ळी हे गतवेळच्या निवडणुकीत सवदी यांचे प्रतिस्पर्धी होते. २३७७१ इतक्या मताधिक्क्याने त्यांचा पराभव झाला होता; मात्र या पराभवाने खचून न जाता त्यांनी मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवत जनतेची कामे केली आहेत. त्यामुळे यावेळी नव्या जोमाने ते पुन्हा सवदी यांच्याविरोधात रिंगणात उतरले आहेत. सवदी यांनी सुरुवातीच्या काळात विकासकामे केली; मात्र गेल्या पाच वर्षांत त्यांचे मतदारांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जनतेत त्यांच्याबाबत नाराजी आहे. याचा फायदा कॉँगेसला होणार आहे.
महेश कुमठळ्ळी यांचा विजय निश्चित आहे, असा दावा कुमठळ्ळी यांचे बंधू मृगेश यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. येथे निधर्मी जनता दलाचे गिरीश बुटाली हे तिसरे उमेदवारही स्पर्धेत आहेत. मात्र, ते कुणाची किती मते खाणार यावरच विजयाचे पारडे कुणाकडे झुकणार हे ठरणार आहे. याशिवाय येथे लिंगायत त्याखालोखाल जैन आणि इतर असे मतदारांचे जातीय समीकरण आहे. ते निकालात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
‘एक व्होट, एक नोट’
काँग्रेसचे उमेदवार महेश कुमठळ्ळी आणि त्यांचे कार्यकर्ते हे मतदारांकडे मताबरोबरच प्रचारासाठी देणगी देण्याचे आवाहनही करीत आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मतदारसंघात कॉँग्रेससाठी ‘एक व्होट, एक नोट’ची चर्चा चालू आहे.