Karnataka Assembly Elections -काँग्रेसकडून अशोभनीय कृत्ये :नरेंद्र मोदी -- बेळगाव येथे प्रचारसभेत आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:21 AM2018-05-10T00:21:45+5:302018-05-10T00:22:22+5:30
बेळगाव/कोलार : लोकशाहीत मतदानाला पवित्र मानले जाते. पवित्र अशा लोकशाहीला अशोभनीय कृत्ये काँग्रेसने केली आहेत. राज्यात हजारो बनावट मतदार ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
बेळगाव/कोलार : लोकशाहीत मतदानाला पवित्र मानले जाते. पवित्र अशा लोकशाहीला अशोभनीय कृत्ये काँग्रेसने केली आहेत. राज्यात हजारो बनावट मतदार ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. चार लाख मतदार संख्या असणाऱ्या मतदारसंघात एक लाख बोगस ओळखपत्रे सापडली आहेत. त्यामुळे मतदारांनी जागरूक राहून मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
बुधवारी सायंकाळी बेळगावमधील जे. एन. एम. सी. मैदानावर आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी खासदार सुरेश अंगडी, राज्यसभा खासदार प्रभाकर कोरे, भाजपचे उमेदवार अनिल बेनके, अभय पाटील, संजय पाटील, विठ्ठल हलगेकर, आदी उपस्थित होते.
यावेळी मोदी म्हणाले की, निवडणुकीत कुकर भरलेले ट्रक पकडले, उमेदवारांचे फोटो असलेले कुकर वाटप करीत काँग्रेस ही पवित्र अशी निवडणूक लढवित आहे. तसेच बदामीत नोटांचे बंडल मिळाले. मंत्र्यांवरील आयकर छाप्यात १३० कोटी मिळाले. हे सर्व दहा टक्के कमिशनमधून आले की काय, असाही आरोप त्यांनी केला.
मागील दरवाजाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीला आले, त्या ठिकाणी त्यांचा पराभव निश्चित आहे. कोट्यवधी रुपये गरीब कर्नाटकच्या जनतेचे आहेत, त्यामुळे तुम्ही सत्तेतून चालते व्हा, अशी टीका त्यांनी केली.
कर्नाटकातील सहा शहरांसाठी स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये ८३६ कोटी रुपयांचे अनुदान दिले. मात्र, या झोपलेल्या सरकारने केवळ १२ कोटींचा वापर केला. उर्वरित ८२४ कोटी तसेच पडून आहेत. देशात जेवढे लोक ए. सी. रेल्वेतून प्रवास करतात तेवढेच लोक विमानातून प्रवास करीत आहेत. छोटी शहरेसुद्धा उड्डाण योजनेत सामील केली आहेत. बेळगावदेखील उड्डाण योजनेत सामील होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मराठी भाषिकांत नाराजी
गेल्या दोन ते तीन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावला दोन ते चार वेळा आले आहेत. मात्र, या निवडणूक प्रचारसभेत त्यांनी आपल्या भाषणात २० हून अधिक वेळा ‘बेळगाव’ शहराच्या नावाचा उल्लेख ‘बेळगावी’ असा केला होता. या आधीच्या दौºयात ‘बेलगाम’ असे संबोधन करीत होते. मात्र, यावेळी प्रत्येकवेळा ‘बेळगावी’ असा उल्लेख केल्याने मराठी भाषिकांत काही प्रमाणात नाराजी व्यक्त झाली.
राहुल गांधी हे तर अहंकारी नेते
काँग्रेसला सहा रोग लागले असून तो पक्ष जिथे जातो, तिथे या रोगांची लागण होते. तसेच स्वत: पंतप्रधान होण्यास आपण तयार आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगणे हा त्यांच्या अहंकाराचा पुरावा आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलारमधील बांगरपेट येथील जाहीत सभेत केला.
काँग्रेस कल्चर (संस्कृती), कम्युनलिझम (सांप्रदायिकता), कास्टिझम (जातीयवाद), करप्शन (भ्रष्टाचार), क्रिमिनलायझेशन (गुन्हेगारीकरण), व काँट्रॅक्टर (कंत्राटदारी) अशा सहा ‘सी’ ने कर्नाटकचे भवितव्य बिघडवून टाकले आहे, असेही मोदी म्हणाले.स्वत:ला अशा प्रकारे पंतप्रधान म्हणून घोषित करणे हा अहंकाराचा पुरावा आहे. मोदी यांनी आज राज्यात तीन सभा घेतल्या. चिकमंगळूरच्या सभेत त्यांनी बनावट ओळखपत्रांचा उल्लेख करून, त्याबद्दल काँग्रेसवर टीका केली.