कर्नाटक प्रवेश बनला आणखीनच खडतर, कोगनोळी चेकपोस्टवर वाहनांच्या रांगाच रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 12:45 PM2021-07-14T12:45:44+5:302021-07-14T12:51:58+5:30
kognoli naka Kolhapur : शेजारील राज्यातील कोरोनाचा संसर्ग आपल्या राज्यात होऊ नये यासाठी कर्नाटक राज्याने राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
कोगनोळी : शेजारील राज्यातील कोरोनाचा संसर्ग आपल्या राज्यात होऊ नये यासाठी कर्नाटक राज्याने राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
72 तासाच्या आतील कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नसेल तर अति महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त राज्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील चेकपोस्टवर तपासणीसाठी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्र किंवा किमान एका लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता नसल्यास त्या प्रवाशास परत पाठीमागे पाठविण्यात येत आहे.
फारच अति महत्वाचे कारण असल्यास या सीमेवर तात्काळ प्रवाशांची रॅपिड टेस्ट करण्यात येते. ही टेस्ट निगेटिव्ह आली तरच राज्यात प्रवेश दिला जातो. मालवाहतूक व परिवहन महामंडळाच्या बसेस मधील प्रवाशांना सुद्धा हे नियम लागू करण्यात आले आहेत.
या चेक पोस्टला अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी, चिकोडीचे पोलीस उपाधिक्षक मनोज कुमार नायक, निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी भेट देऊन पाहणी केली व योग्य त्या सूचना दिल्या.