महाराष्ट्रातील उसावर कर्नाटक मारणार डल्ला
By admin | Published: October 15, 2016 12:56 AM2016-10-15T00:56:46+5:302016-10-15T00:56:46+5:30
सीमेवरील कारखाने अडचणीत : १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
जहाँगीर शेख ल्ल कागल
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ डिसेंबरला सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. या निर्णयाचा फटका कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ असणाऱ्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बसणार आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचेही नुकसान होणार असल्याने शासनाने हा निर्णय बदलावा, अशी मागणी सर्वच पातळ्यांवर होत आहे. कर्नाटकापेक्षा १५ दिवस उशिरा महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झाले, तर कर्नाटकातील सीमेलगतचे साखर कारखाने महाराष्ट्रातील पाच ते सहा लाख मेट्रिक टन उसावर डल्ला मारू शकतात, अशी परिस्थिती आहे.
गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे या गळीत हंगामात उसाची उपलब्धता कमी आहे. तीन ते चार महिन्यांचा हंगाम असेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर हंगाम उशिरा सुरू करून जादा परिक्व झालेला ऊस गाळप करून साखर उत्पादन वाढविण्याच्या हेतूने मंत्री समितीने ही १ डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे, पण इथले कारखाने उशिरा सुरू झाले म्हणजे हा ऊस शिवारातच थांबेल, अशी परिस्थिती नाही. यापूर्वीही कर्नाटकातील आठ ते दहा कारखान्यांनी महाराष्ट्रातील उशिरा हंगामाचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात ऊस उचल केली होती. आज तीच परिस्थिती या हंगामात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरबरोबरच सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. दोन्ही जिल्ह्यांत मिळून ३८ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १५ ते १६ कारखाने कर्नाटकातून ऊस आणतात, तर दोन्ही राज्यातील काही कारखाने ‘मल्टी स्टेट’ अॅक्टने नोंदणीकृत आहेत.
महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ऊस दराबद्दल आंदोलन छेडले जाते. हंगाम सुरू करण्यास अटकाव केला जातो. चालू वर्षी संघटनेनेही अजून थेट अशी कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे साखर कारखानदारही हंगाम कधी सुरू करायचा यासाठी सल्लामसलत करीत आहेत. १ डिसेंबरपूर्वी जर कोणी हंगाम सुरू केलाच तर त्या कारखान्यास प्रतिटन ५०० रुपयांचा दंड आकारण्याची भीतीही घालण्यात आल्याने काहीच हालचाल करता येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. १५ नोेव्हेंबर २०१६ पूर्वीच ऊस गाळप करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
सीमा भागातील प्रमुख कारखाने
४कोल्हापूर जिल्हा : छत्रपती शाहू साखर कारखाना, कागल, जवाहर-हुपरी, ३) दत्त, शिरोळ, ४) पंचगंगा, इचलकरंजी, दौलत, चंदगड. हे पाच कारखाने मल्टिस्टेट आहेत. एकूण गाळपाच्या १५ ते ३० टक्केपर्यंतचा ऊस हे कारखाने कर्नाटकातून आणतात. म्हणजे छत्रपती शाहू साखर कारखाना जवळपास १ लाख मेट्रिक टन, तर जवाहर-हुपरी अडीच ते तीन लाख मेट्रिक टन ऊस कर्नाटकातून आणतो. या शिवाय सरसेनापती संताजी घोरपडे, सदाशिवराव मंडलिक, हमीदवाडा, हेमरस शुगर, गडहिंग्लज, आजरा, शरद-नरंदे, गुरुदत्त टाकळी, दालमिया शुगर हे कारखानेही ५० हजारांपासून दीड-दोन लाख मेट्रिक टनपर्यंतचा ऊस आणतात. या १५ दिवसांच्या फरकामुळे म्हणूनच पाच ते सहा लाख मेट्रिक टनाचा फटका या कारखान्यांना बसणार आहे. म्हणजे एका कारखान्याचा संपूर्ण गाळप हंगामाचा ऊस पळविला जाणार आहे.
कर्नाटकातील या कारखान्यांना संधी
संकेश्वर साखर कारखाना, चिक्कोडी येथील दूधगंगा-कृष्णा आणि उगार शुगर हे मल्टिस्टेट असल्याने त्याचे हक्काचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रात आहेत, तर हालसिद्धनाथ, शिवशक्ती शुगर, व्यंकटेश्वरा, बेडकिहाळ, कागवाड येथील कारखाने या १५ दिवसांत महाराष्ट्रातील ऊस मोठ्या प्रमाणात उचलतील. त्याचबरोबर कर्नाटकातील काही कारखाने पहिली एकच उचल कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बरोबरीने देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करतात. नंतर मात्र एकही उचल देत नाहीत. चालू वर्षी यात वाढच होेण्याची शक्यता आहे.