कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार? आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 17:05 IST2022-10-08T17:04:38+5:302022-10-08T17:05:17+5:30
उंची वाढली तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ६०० गावात महापूर येण्याची शक्यता

कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार? आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी दिला इशारा
जयसिंगपूर: सध्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, शासकीय पातळीवर त्याच्या हालचाली सुरु नाहीत. कर्नाटक सरकारने याबाबत महाराष्ट्र शासनाला अवगत केले नाही, अथवा त्यांनी राज्य सरकारशी कोणतीही चर्चा केली नाही, अलमट्टीची उंची एकतर्फी वाढवण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्न हाणून पाडला जाईल असा इशारा माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटक शासनाच्या या भूमिकेबाबत आपण लवकरच भेट घेऊन चर्चा करणार असून राज्य शासनाच्या माध्यमातून आपण प्रखर विरोध करू अशी माहिती यड्रावकर यांनी दिली आहे.
सातत्याने येणाऱ्या महापुरामुळे सन २००५ पासून शिरोळ तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी पाहता अलमट्टीच्या उंचीबाबत आपला विरोध कायम राहील असे स्पष्ट करुन यड्रावकर म्हणाले, अलमट्टी धरण बांधल्यापासून सन २००५ मध्ये पहिला महापूर आला. कर्नाटक शासनाने अलमट्टीमुळे पूर येत नाही, असा कागदोपत्री दावा केला असला तरी याचा पुन्हा सर्व्हे होणे गरजेचे आहे. उंची वाढली तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ६०० गावात महापूर येण्याची शक्यता आहे.