अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत कर्नाटक सरकार योग्य निर्णय घेईल, मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 06:25 PM2022-12-31T18:25:13+5:302022-12-31T18:50:04+5:30
कन्यागत महापर्वकाळ निधीचा प्रश्न मार्गी लावू
प्रशांत कोडणीकर
नृसिंहवाडी : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास त्याचे परिणाम काय होतील याचा अभ्यास केल्याशिवाय उंची वाढविणे योग्य होणार नाही. याबाबत कर्नाटक सरकारशी आम्ही बोलू. ते योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला खात्री असल्याचा विश्वास शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर व्यक्त केला. धार्मिक विधी व दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडी येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, सातत्याने येणाऱ्या महापुराचा सामना करण्यासाठी गतवर्षी प्रमाणे पॅटर्न राबवून पुराचा धोका टाळला जाईल असे सांगितले. तर, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती बाबत कालबद्ध कार्यक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. २०२५ पर्यंत पंचगंगा नदी निश्चित प्रदूषणमुक्त होईल याची खात्री आम्ही देतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आज, शनिवारी दुपारी मंत्री केसरकर धार्मिक विधी व दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडी येथे खासगी दौऱ्यावर आले होते. सुरुवातीस त्यांनी दत्त दर्शन घेऊन प्रार्थना केली. व कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर नातेवाईकांच्या धार्मिक विधीसाठी हजेरी लावली.
यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने, तहसीलदार अपर्णा मोरे, दत्त देव संस्थानचे विश्वस्त सोनू उर्फ संजय पुजारी, ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते तसेच अभिजित जगदाळे, सागर धनवडे, सागर मोरबाळे, ग्रामसेवक बी एन टोने आदी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. दत्त देव संस्थानचे वतीने विश्वस्त सोनू उर्फ संजय पुजारी यांनी मंत्री केसरकर यांना शाल, श्रीफळ व दत्त प्रतिमा देऊन सत्कार केला.
कन्यागत महापर्वकाळ निधीचा प्रश्न मार्गी लावू
नृसिंहावाडी येथील कन्यागत महापर्वकाळ दुसर्या टप्प्यातील निधी बाबत ७ जानेवारीला नियोजनाच्या बैठकीत निश्चित निर्णय घेऊन रखडलेल्या निधी बाबतचा प्रश्न मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले.