पुण्यातील गुळाने कोल्हापूरच्या हंगामाचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:46 AM2019-09-06T00:46:33+5:302019-09-06T00:46:37+5:30
कोल्हापूर : गुळाचे आगर असलेल्या करवीर व पन्हाळा तालुक्यांना महापुराचा फटका बसल्याने गणेशचतुर्थीच्या निमित्ताने निघणाऱ्या हंगामातील पहिल्या सौद्याचा मान ...
कोल्हापूर : गुळाचे आगर असलेल्या करवीर व पन्हाळा तालुक्यांना महापुराचा फटका बसल्याने गणेशचतुर्थीच्या निमित्ताने निघणाऱ्या हंगामातील पहिल्या सौद्याचा मान पुणे जिल्ह्यातील गुळाला मिळाला. कागल तालुक्यातील व्हन्नाळी येथून काही प्रमाणात गूळ सौद्यासाठी आला. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्याला सहा हजार ५०१ रुपये असा विक्रमी दर मिळाला. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा २० दिवस आधीच गुळाच्या हंगामाचा श्रीगणेशा झाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सकाळी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या हस्ते व सभापती बाबासाहेब लाड, उपसभापती संगीता पाटील यांच्या उपस्थितीत सौदा काढण्यात आला. मुहूर्ताच्या पहिल्या १० किलोंचे ५१ रवे व्यापारी अतुल शहा यांनी साडेसहा हजार रुपयांना घेतले. उर्वरित गुळाला ३३०० ते ६५०१ रुपये असा दर मिळाला.
कोल्हापुरातील गुळाच्या हंगामाची सुरुवात जरी दसºयापासून होत असली तरी गणेशोत्सवाच्या काळात पहिला सौदा काढून हंगामाचा श्रीगणेशा केला जातो. त्यानंतर १५-२० दिवसांनी हंगाम गती घेतो. गेल्या २५ सप्टेंबरच्या दरम्यान मुहूर्ताचा सौदा झाला होता. यावर्षी तो तब्बल २० दिवस आधी आला आहे.
महापूरामुळे यावर्षी सौद्यासाठी परजिल्ह्यातून गूळ मागवावा लागला. दरवर्षी पुण्यातील कुंजीरवाडी येथील दत्तात्रय सावंत यांचा गूळ सौद्यासाठी येतो; पण तो महिनाभर आधीच कोल्हापुरात आला आहे. १० किलोंचे ६०० रवे सौद्यासाठी आणले होते. श्री भैरवनाथ अडत दुकानी सौदा निघाला. व्हन्नाळी येथील तानाजी जाधव व सागर जाधव यांच्या १० किलोंच्या ११०० गुळाच्या रव्यांचे सौदे बी. के. अतितकर यांच्या दुकानी निघाले.
सौद्याच्या कार्यक्रमास संचालक कृष्णात पाटील, अमित कांबळे, सर्जेराव पाटील, दशरथ माने, उदयसिंह पाटील, आशालता पाटील, शेखर येडगे, संजय जाधव, शशिकांत आडनाईक, नंदकुमार वळंजू, सदानंद कोरगावकर, नेताजी पाटील, बाबूराव खोत, किरण पाटील, नानासो पाटील, सरदार पाटील यांच्यासह बाजार समितीचे सचिव मोहन सालपे, उपसचिव तानाजी मोरे, जयवंत पाटील आदि उपस्थित होते.