कर्नाटकला राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडले
By admin | Published: April 14, 2017 12:07 AM2017-04-14T00:07:16+5:302017-04-14T00:07:16+5:30
कोयनेतून तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू, अडीच टीएमसी पाणी देणार
मिरज : कर्नाटकात सीमाभागातील गावात तीव्र पाणी टंचाईमुळे शिरोळजवळ राजापूर बंधाऱ्यातून गुरुवारी पाणी सोडण्यात आले. कर्नाटकसाठी कोयना धरणातून प्रतिसेकंद ३ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, २.६ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. राजापूर बंधाऱ्यातून प्रतिसेकंद १ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून, उद्या शुक्रवारी कुडचीपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता आहे.
राजापूर येथील बंधाऱ्यापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडली आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र जलसंपदा विभागाकडे केली होती. महाराष्ट्रात धरणे बांधताना कर्नाटकाला उन्हाळ्यात पाणी देण्याचा करार आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात कोयना व वारणा धरणातून कर्नाटकाला दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. या दोन टीएमसी पाण्याच्या बदल्यात कर्नाटकने अक्कलकोट परिसरात पाणी सोडले होते.
चांगल्या पावसाने वारणा व कोयना धरणात यावर्षी पुरेसा पाणीसाठा असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. कर्नाटकच्या मागणीबाबत जलसंपदा विभागाने सांगली पाटबंधारे विभागास पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर गुरुवारी राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात आले.
कोयना धरणातून २.६ टीएमसी पाणी कर्नाटकात सोडण्यात येणार असून, सुमारे एक महिना राजापूर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकातून जत व अक्कलकोट तालुक्यात पाणी देण्यात येणार आहे. कर्नाटकला पाणी सोडण्यात येत असल्याने सांगली, मिरज परिसरात नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, पाणी प्रवाहित राहणार आहे. (वार्ताहर)
कर्नाटकात पाणीटंचाई
कर्नाटकात उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असल्याने नदीच्या दोन्ही काठावरील कुडची, उगार, जुगुळ, शिरगुप्पी, ऐनापुर, कृष्णाकित्तूर यासह अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठल्याने जमखंडी व बागलकोट परिसरात पाणी टंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. पाणी टंचाईने त्रस्त सीमा भागातील ग्रामस्थांना महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात आल्