बेळगाव : कर्नाटक पोलिसांचा मराठी युवकांवर लाठीमार : बेळगावात काळा दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:19 AM2018-11-02T00:19:46+5:302018-11-02T00:21:53+5:30
‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल मे’, ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशा घोषणा देत हजारो मराठी भाषिकांनी काळा दिनाच्या सायकल फेरीत सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, मूक सायकल फेरी गोवा वेस सर्कलजवळ आली
बेळगाव : ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल मे’, ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशा घोषणा देत हजारो मराठी भाषिकांनी काळा दिनाच्या सायकल फेरीत सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, मूक सायकल फेरी गोवा वेस सर्कलजवळ आली असताना टिळकवाडीकडून राज्योत्सव साजरा करायला जाणारे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी कर्नाटक पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी मराठी तरुणांना यावेळी लक्ष्य केल्याचा आरोप केला.
शहरातून काळा दिनाचा एकच झंझावात झाला. हजारोंच्या संख्येने युवक आणि महिलांनी सहभाग घेतला. उपमहापौर मधुश्री पुजारी यांचा सहभाग आणि शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सहभागाने ही फेरी यशस्वी झालीे. गुरुवारी सकाळी ९ वाजता या फेरीस धर्मवीर संभाजी उद्यान येथून सुरुवात झाली. यामध्ये कोल्हापुरातून शिवसेनेचे विजय देवणे सहभागी झाले होते.
लोकशाही आणि न्यायाच्या मार्गाने १ नोव्हेंबरला मूक सायकल फेरी काढण्यात येते, पण यंदा सकाळपर्यंत या फेरीस परवानगी मिळालेली नव्हती. सकाळी सात वाजता परवानगी देण्यात आली. त्यामुळे उपस्थिती कमी होईल, असे वाटत होते. तरीही हजारो तरुण यामध्ये सहभागी झाले होते.
मध्यवर्ती महाराष्ट एकीकरण समितीचे नेते परवानगीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात रात्रभर बसून होते, पण परवानगी मिळाली नव्हती. बुधवारी परवानगी मागायला गेलेल्या नेत्यांना प्रत्येकी पाच लाखांचे हमीपत्र आणून द्या, असे पोलिसांनी सांगितले होते. त्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. यावर आज, शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे.
लाठीमाराचे गालबोट
फेरी शेवटच्या टप्प्यात गोवावेस येथे आली असताना काही कार्यकर्त्यांनी गैरसमजातून फटाके फोडून पोलिसांवर फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला; पण या लाठीमाराचे गालबोट रॅलीस लागले.
बेळगावात गुरुवारी काळा दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मराठी भाषिकांनी ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल मे’, ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा दिल्या. या फेरीत हजारोंच्या संख्येने तरुण आणि महिलांनी सहभाग घेतला होता.
बेळगावात आयोजित मूक सायकल फेरीवेळी मराठा युवकांवर कर्नाटक पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.