कर्नाटकाचे पाण्यासाठी महाराष्ट्राला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:22 AM2020-05-12T06:22:44+5:302020-05-12T06:23:21+5:30
यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती.
- चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच उत्तर कर्नाटकातील सहा जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई भासू लागली आहे. तिला तोंड देण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी आणि उजनीमधून तीन टीएमसी असे सहा टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मार्चच्या सुरुवातीपासूनच बेळगाव, विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, यादगिरी आणि रायचूर जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. एप्रिलमध्ये ती तीव्र झाली. मे मध्ये ती आणखी भीषण होणार आहे. त्यामुळे महाराष्टÑ सरकारने मानवतावादी भूमिकेतून कोयना धरणातून ३ आणि उजनी धरणातून ३ असे सहा टीएमसी पाणी सोडावे. यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविता येईल तसेच जनावरेही जगवता येतील, असे येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘कोयना’मध्ये ४३ टीएमसी पाणी
कोयना धरण सोमवार, दि. ११ रोजी ४२.७६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपातळी २०९८.०६ फूट आहे. कोयनेच्या पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील शिल्लक पाणीसाठा महिनाभर सहज पुरू शकतो. गेल्या वर्षी कोयना धरणात १२ मे रोजी अवघा ३१.०६ टीएमसी पाणी शिल्लक होते. तर उजनी धरणात ६४.५७ टीएमसी पाणीसाठ शिल्लक आहे.
कर्नाटकसाठी ६ टीएमसी पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्री येदियुराप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राबाबत माहिती नाही. ती मिळाल्यावर धरणात शिल्लक पाणीसाठा किती आहे हे पाहून योग्य निर्णय घेतला जाईल.
- जयंत पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री