कर्नाटक एस.टी. महामंडळाचा संप : भुर्दंड प्रवाशांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:37 AM2020-12-14T04:37:19+5:302020-12-14T04:37:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उत्तर व दक्षिण कर्नाटक राज्य परिवहन महामार्ग महामंडळाच्या चालक-वाहकांनी महामंडळाऐवजी शासनाकडे वर्ग करा, या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उत्तर व दक्षिण कर्नाटक राज्य परिवहन महामार्ग महामंडळाच्या चालक-वाहकांनी महामंडळाऐवजी शासनाकडे वर्ग करा, या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे कोल्हापूरहून निपाणी, संकेश्वर, बेळगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना अनुक्रमे प्रतिमाणसी १००, २०० आणि १००० असा भुर्दंड पडत आहे.
कर्नाटक एस.टी. महामंडळातील चालक-वाहकांनी त्यांना महामंडळाऐवजी शासनाकडे वर्ग करा, म्हणून गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे कोल्हापूरहून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यात कोल्हापूरहून या मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या रोज २५ एस.टी. बसेस रवाना होतात. मात्र, तेथील संपाच्या पार्श्वभूमीवर या बसेसचे नुकसान होऊ नये म्हणून त्या बंद केल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून निपाणीसह बेळगावकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्याचा फायदा खासगी वाहनचालक घेऊ लागले आहे. मनमानी कारभारामुळे निपाणीसाठी प्रतिमाणसी १०० ते १५०, संकेश्वरसाठी २०० ते २५० आणि बेळगावसाठी ८०० ते १००० रुपये आकारले जात आहेत. या अव्वाच्या सव्वा भाडेआकारणीमुळे प्रवासी वर्गाच्या खिशाला मोठा चाट पडत आहे. अशा प्रकारे मनमानी करणाऱ्या वाहनधारकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी संतप्त प्रवाशांतून होत आहे.