कोल्हापूर: कणेरी मठावर कर्नाटक भवन उभारू देणार नाही, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 06:00 PM2022-10-14T18:00:20+5:302022-10-14T18:01:00+5:30
कणेरी (ता. करवीर) मठावर येऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री जर कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा करून मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणार असतील, तर शिवसेना त्याला विरोध करेल.
कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) मठावर येऊन कर्नाटकचेमुख्यमंत्री जर कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा करून मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणार असतील, तर शिवसेना त्याला विरोध करेल. सीमाभागासाठी मराठी माणसांनी १०५ हुतात्म्यांचे बलिदान दिले आहे. त्यांच्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरुन जाब विचारेल, असा इशारा शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. या मठाच्या अदृष्य काडसिध्देश्वर महाराजांनीही मठाच्या आडून राजकीय पक्षाचे काम करू नये, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कणेरी मठाच्या काडसिध्देश्वर महाराजांच्या माध्यमातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात मठावर पाच कोटी रुपये खर्चून कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा केली. शिवसेनेने या घोषणेला विरोध केला असून, पत्रकार परिषदेत काडसिध्देश्वर महाराजांचा आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. पवार म्हणाले, कर्नाटकने महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून हे दाखवून दिले की, महाराष्ट्राचे सरकार कुचकामी आहे. विधायक काम करायला शिवसेनेचा विरोध नाही; पण धार्मिकतेच्या नावावर राजकारण खपवून घेणार नाही.
मराठी माणसावर वर्षानुवर्षे होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तसेच सीमाभागासाठी बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे आणि शिवसेना अखंडपणे लढत आली आहे. अशावेळी शेजारील राज्य कोल्हापुरात कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा करत असेल, तर शिवसैनिक जाब विचारतील. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते, तोपर्यंत महाराष्ट्रात पाऊल टाकण्याचे धाडस न करणाऱ्या कर्नाटकने आताच हे धाडस कसे केले, याची शंका येते.
रविकिरण इंगवले यांनी कणेरीच्या काडसिध्देश्वर महाराजांना एका विशिष्ट पक्षाच्या आडून राजकारण करू नका, असा इशारा दिला. कोणत्याआधारे कर्नाटक भवन बांधणार, याचा जाब आम्ही प्रत्यक्ष महाराजांना भेटून विचारणार असल्याचे इंगवले यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही कर्नाटकात महाराष्ट्र भवन बांधून दाखवावे, तोपर्यंत कर्नाटक भवन स्थापन करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शिवजयंती उत्सव नाकारणारा, कन्नड भाषेची सक्ती करणारे, बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यांचे दहन करणारे कानडी महाराष्ट्रात कशाला येतात, असाही सवाल त्यांनी केला.