कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर उत्साहात -बैलांना सजविले : कर तोडण्याचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:56 PM2019-06-18T23:56:44+5:302019-06-18T23:57:35+5:30
काळ्या मातीतून धान्यांचं सोनं उगवण्यासाठी मालकाबरोबर राबणाऱ्या बैलांंसह समृद्धी देणाºया गाय, म्हशीप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदूर मंगळवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला
कोल्हापूर : काळ्या मातीतून धान्यांचं सोनं उगवण्यासाठी मालकाबरोबर राबणाऱ्या बैलांंसह समृद्धी देणाºया गाय, म्हशीप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदूर मंगळवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला.
जयसिंगपुरात बैलांची सवाद्य मिरवणूक
जयसिंगपूर शहरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेतकरी बांधवांनी बैलाबरोबर म्हैस, गायींना सजवून त्यांची पूजा-अर्चा केली. बेंदूर निमित्ताने मंगळवारी शहरातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. जट्याप्पा कोळी, मच्छिंद्र पडुळकर, संजय कोळी, सुनिल पडुळकर यांच्या बैलांना विविध रंगरंगोटी करुन आकर्षक सजविले होते.
गडहिंग्लज येथे पी-ढबाकच्या गजरात बैलजोड्यांच्या मिरवणुका
गडहिंग्लज शहरात पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात कर्नाटकी बेंदूर साजरा केला. बेंदूरनिमित्त पी-ढबाक्च्या गजरात हुर्रमंजच्या रंगात न्हालेल्या बैलजोड्यांच्या दिवसभर मिरवणुका काढल्या. सायंकाळी मारुती मंदिराजवळ पारंपरिक पद्धतीने कर तोडण्याचा कार्यक्रम झाला. सुवासिनींच्या औक्षणानंतर मानाच्या बैलजोडींनी कर तोडली. कर तोडल्यानंतर खातेदार यशवंत पाटील यांच्या घरी बैलांचे पूजन केले. यंदा संजय संकपाळ यांच्या बैलजोडीला कर तोडण्याचा मान मिळाला.
यड्राव येथे बेंदूर उत्साहात
यड्राव येथील परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहाने साजरा केला. सकाळपासूनच शेतकरी बैलांसह गाय, म्हशींना सजविण्यामध्ये दंग झाले होते. सायंकाळी सरकार वाड्यामध्ये कर तोडणी, मोठा गोलाकार दगड (गुंड) उचलण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बैल सजावटीनंतर त्याला औक्षण करून नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच सायंकाळी चार वाजता कर तोडणीचा तसेच १२५ किलो वजनाचा दगड (गुंड) उचलण्याचा कार्यक्रम पार पडला.
म्हाकवेत कर तोडण्याचा कार्यक्रम
म्हाकवे (ता. कागल) येथे बेंदूर सणानिमित्त बैलजोडीची मिरवणूक व कर तोडण्याचा कार्यक्रम मंगळवारी उत्साहात झाला. शतकोत्तर असणाºया या परंपरेला विधायक झालर लाभली. पी-ढबाक्चा सूर...हलगीचा कडकडाट...सजवलेली बैलजोडी आणि गावकऱ्यांच्या सळसळत्या उत्साहात निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मुख्य मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. म्हाकवे येथील नवीन वसाहतीतून मारुती भागोजी पाटील यांच्या घरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. बसस्थानकावरून मुख्य बाजारपेठेत गेल्यानंतर या मानाच्या बैलजोडीने कर तोडली.
सिद्धनेर्लीत बैलांची मिरवणूक
सिद्धनेर्ली (ता. कागल) परिसरामध्ये कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पिंपळगाव, व्हन्नूर, सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी आदी गावांमध्ये सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली. मिरवणुकीला सुरुवात करण्याआधी पोलीसपाटील आणि सरपंच यांच्या हस्ते बैलांचे पूजन केले.
भोगावतीत बेंदूर उत्साहात
कौलव (ता. राधानगरी) येथील पाटीलकीचा मान असलेल्या आनंदा पाटील यांच्या बैलाने हनुमान मंदिर चौकात पारंपरिक पद्धतीने कर तोडली. यावेळी बैलांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. कौलव येथे पाटीलकीचा मान असलेल्या आनंदा कोंडी पाटील, आनंदा दत्तात्रेय पाटील यांच्या बैलांनी हनुमान चौकात वाजत-गाजत कर तोडली.
कसबा सांगाव येथे मिरवणुका
सजवलेली रंगीबेरंगी शिंगे, त्यांना बांधलेली गुलाबी रिबन, बँजोचा ठेका अशा थाटात कसबा सांगाव येथे बैलजोड्यांची मिरवणूक काढली. कृष्णात माळी, बाबासाहेब चिकोडे, संजय कांबळे यांच्या हस्ते बैलांचे पूजन केले.
मुरगूडला मानाच्या बैलाने कर तोडली
मुरगूड (ता. कागल) येथे बेंदूर उत्साहात साजरा झाला. मानाच्या बैलानी कर तोडली. राजर्षी शाहूंनी मुरगूडच्या हरिभाऊ पाटील यांच्या घराण्याकडे बेंदराच्या करतोडणीचा मान दिला होता. दरवर्षी पाटील घराण्याकडून बेंदरासाठी बैल खरेदी केला जातो. सायंकाळी पाचच्या सुमारास अंबाबाई देवालयापासून या मानाच्या बैलाची वाजत गाजत मिरवणूक सुरू होते. ग्रामदैवत हनुमानाच्या मंदिरासमोर कर तोडली जाते. मुरगूडभूषण विठ्ठलराव व त्यांचे बंधू विश्वनाथराव पाटील यांनी ही परंपरा दुसºया पिढीत निष्ठेने जपली. तिसºया पिढीतील वारस दिलीपसिंह, रणजितसिंह, प्रवीणसिंह, अजितसिंह, अविनाश व रविराज पाटील ही परंपरा पुढे नेत आहेत.
मुरगूड (ता. कागल) येथे राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या बेंदूर कर तोडणीसाठी पाटील घराण्यातील मानाच्या बैलाची शहरातून अशी मिरवणूक काढली.