कोरोनाच्या सावटातही कर्नाटकी बेंदूर दणक्यात, पंचगंगा नदीघाट गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 02:02 PM2020-06-08T14:02:59+5:302020-06-08T14:04:37+5:30
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर सण कोरोनाच्या सावटातही रविवारी सीमाभागातील गावांसह जिल्ह्यात दणक्यात साजरा झाला. घरोघरी बैलांची पूजाअर्चा करून त्यांची ओवाळणी झाली. कोरोनामुळे कर तोडण्याच्या विधीवर मर्यादा आल्या तरी उत्साह मात्र कायम होता. पंचगंगा नदीघाट तर ढोल, ताशा, हलग्यांच्या दणदणाटात दुमदुमून गेला.
कोल्हापूर : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर सण कोरोनाच्या सावटातही रविवारी सीमाभागातील गावांसह जिल्ह्यात दणक्यात साजरा झाला. घरोघरी बैलांची पूजाअर्चा करून त्यांची ओवाळणी झाली. कोरोनामुळे कर तोडण्याच्या विधीवर मर्यादा आल्या तरी उत्साह मात्र कायम होता. पंचगंगा नदीघाट तर ढोल, ताशा, हलग्यांच्या दणदणाटात दुमदुमून गेला.
जिल्ह्यातील कर्नाटक सीमेलगतच्या गावांमध्ये शनिवारी (दि. ६) कर्नाटकी बेंदूर साजरा केला गेला. दरवर्षी अगदी जल्लोषात होणाऱ्या या सणावर यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मर्यादा आल्या होत्या. घरगुती पद्धतीनेच सण साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते; पण प्रत्यक्षात रविवारी त्याचे पालन झाले नसल्याचेच दिसले. कोरोना विसरून शहरात सर्वत्र सजवलेल्या बैलांसह फेरफटका मारून सणाचा आनंद घेतला.
पंचगंगा नदीघाटावर वाजतगाजतच बैलांचे आगमन होत होते. नदीपात्रात यथेच्छ अंघोळ घातल्यानंतर त्यांचा घाटावर येऊन साजशृंगार केला जात होता. नवी वेसण, घुंगरू, गोंडे, झुली घालून बैलांना नटवले जात होते. शिंगांसह अंगावरही रंगाने नक्षीकाम केले जात होते. या नटवण्यामध्ये तरुणाई आणि बच्चेकंपनीचाच सहभाग जास्त दिसत होता. नटवून झाल्यानंतर बैलांसह हलगी व ताशाच्या गजरात तरुणाईने घाटावरच ठेका धरला.
अडीच महिन्यांनी वाजंत्र्यांची कमाई
लॉकडाऊन जाहीर झाल्याने सर्व सण, कार्यक्रम बंद झाल्याने अडीच महिन्यांपासूून वाजंत्र्यांचे बाहेर पडणेही थांबले. बेंदराच्या निमित्ताने हलगी, ताशा कडाडल्याने ३०० रुपये का असेना; पण कमाई सुरू झाल्याचा आनंद वाजंत्र्याच्या चेहऱ्यावरून ओंसंडून वाहताना दिसत होता. वाजंत्री असलेल्या अतुल घडशी या तरुणाने तर हलगीलाच सलाम करून कामाला सुरुवात केली.
बेंदराच्या या उत्साहात बैलांच्या अंघोळीपासून ते त्यांना सजवण्यापर्यंतची सर्व कामे तरुणाईने आपल्या हातात घेतल्याचे सुखद चित्र दिसत असतानाच याच तरुणाईने कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणाच्या भावनेलाच गालबोट लावण्याचेही काम केले.
बैलासह सेल्फी, व्हिडीओ इथेपर्यंत ठीक होते; पण काही अतिउत्साही तरुणांनी बैलांसमोर छत्री धरून त्यांना उसकवण्याचा प्रयत्न केला. यातून बैल उधळला. दुचाकीही खाली पडल्या. एक लहान मुलगाही खाली पडला. सुदैवाने एकाने त्याला उचलून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. बैलांच्या डोळ्यांसमोर गुलाल फेकला जात होता. त्यांच्या मागे दुचाकी लावून त्यांना जोरदार पळवलेही जात होते. यातून विकृतीच दिसून आली.