करवीरमध्ये सेनेच्या बाणाचा नेम चुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:07+5:302021-01-19T04:26:07+5:30
कोपार्डे : करवीर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीत बहुतांश ठिकाणी शिवसेनेकडे असणाऱ्या ग्रामपंचायतींची सत्ता गेल्याने बॅकफूटवर गेली आहे, ...
कोपार्डे : करवीर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीत बहुतांश ठिकाणी शिवसेनेकडे असणाऱ्या ग्रामपंचायतींची सत्ता गेल्याने बॅकफूटवर गेली आहे, तर भाजपने तीन ग्रामपंचायतीत सत्ता मिळवून कमबॅक केले आहे. स्थानिक आघाड्यांची मोठ्या प्रमाणात सरशी झाली आहे. पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायतींच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीत १३ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. १० ग्रामपंचायतींमध्ये सत्ता कायम राखण्यात यश आले असून ३४ ठिकाणी स्थानिक आघाड्यांची सरशी झाली आहे. पाडळी खुर्द व पाटेकरवाडी येथे दोन्ही गटांना समान जागा मिळाल्या असून, येथे एक अपक्ष निवडून आल्याने सत्तेची किल्ली कोणाच्या हातात द्यायची, हे अपक्ष ठरवणार आहेत.
करवीर तालुक्यात करवीर विधानसभा मतदारसंघात ४० व दक्षिण विधानसभा मतदारसंघात १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. यात कोपार्डे, खुपीरे, शिये, कुडित्रे, आमशी, कळंबे तर्फ कळे, भामटे, साबळेवाडी या प्रमुख गावांतील शिवसेनेकडे असलेली सत्ता काँग्रेस व स्थानिक आघाडीने काबीज केली. केवळ कोगे, हणमंतवाडी, शिंदेवाडी येथे सत्ता राखण्यात सेनेला यश आले. काँग्रेसच्या ताब्यातील कुर्डू, बेले, हळदी येथे सत्तांतर झाले. सडोली खा।। येथे आमदार पी. एन. पाटील यांनी १३ जागा जिंकत सत्ता राखली, तर शेकापचे संपतराव पवार यांना ३ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने कम बॅक केले असून करवीर तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी हळदी गावात सत्ता मिळविली. मुुुडशिंगीत अमल महाडिक गटाने, तर नामदेव पाटील गटाने कुरुकलीत व कोगिल बु।। मध्ये सत्ता मिळवून भाजपने कम बॅक केले. करवीर तालुक्यात २७ ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांची सरशी झाली आहे.
तालुक्याचे बलाबल...
स्थानिक आघाडी -- ३४
शिवसेना --३
काँग्रेस -- ११
राष्ट्रवादी -- २
भाजप ४
.............
तामगावमध्ये चिठ्ठीवर विजय
तामगाव येथील शामबाला दीपक कुंभार व अंजली गंगाधर यांना समान २१३ मते मिळाली. शेवटी चिठ्ठीवर निकाल देण्याचे ठरले. यात शामबाला कुंभार यांना विजयी घोषित केले.
............
आमशीत विमल पाटील यांना धक्का
आमशीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला. येथे शिवशंभो आघाडीचे ए. के. पाटील निवृत्ती पाटील व आर. टी. पाटील यांच्या शिवशंभो पॅनेलने जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विमल पाटील, कुंडलिक पाटील गटाच्या २५ वर्षांच्या सत्तेला खिंडार पाडले.
...............
कुडित्रेत संत्तातर
कुडित्रेत यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील व ‘कुंभी’चे संचालक बाजीराव शेलार यांच्या गटाचा ‘कुंभी’चे माजी अध्यक्ष संभाजी पाटील व मदन पाटील यांच्या गटाने पराभव केला. कोपार्डे येथे ‘कुंभी’चे संचालक विलास पाटील यांची सत्ता एस. के. पाटील नामदेव पाटील गटाने ८ विरुद्ध ५ अशी, तर खुपीरेत ‘कुंभी’चे संचालक संजय पाटील यांची सत्ता माजी अध्यक्ष तुकाराम पाटील, सर्जेराव पाटील, सरदार बंगे, प्रकाश चौगले गटाने ९ विरुद्ध ६ अशी हस्तगत केली.
............
सत्तांतर झालेल्या ग्रामपंचायती...
कुर्डू, बेले, कोगील बु।।, आमशी, कोपार्डे, घानवडे, शिये, निगवे दु।।, खुपीरे, साबळेवाडी, कळंबे तर्फे कळे
सत्ता कायम असणाऱ्या ग्रामपंचायती -- कुरूकली, गिरगाव, मुडशिंगी, देवाळे, खेबवडे, इस्पुर्ली, नंदगाव, सडोली खा।।, गाडेगोंडवाडी.
बिनविरोध -- आरे, उपवडे, खाटांगळे, चाफोडी, म्हारूळ
त्रिशंकू -- पाटेकरवाडी, पाडळी खुर्द.
(फोटो)
१) निगवे दु।। येथे सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्त्यांनी जल्लोष केला. २) आमशी येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील व कुंडलिक पाटील यांची सत्ता काढून घेतल्यानंतर शिवशंभो पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला.