करवीर पतसंस्था अपहार: अध्यक्ष अतुल कारंडे, संचालक मंडळासह ३४ जणांवर गुन्हा

By विश्वास पाटील | Updated: December 7, 2024 12:24 IST2024-12-07T12:23:42+5:302024-12-07T12:24:44+5:30

संस्थेकडून अंतर्गत लेखापरिक्षण करुन घेण्यात आले. त्यामध्ये संस्थेमध्ये ठेवीदारांच्या गुंतविण्यात आलेल्या रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे निदर्शनास आले.

Karveer Credit Institution fraud: Chairman Atul Karande, board of directors and 34 persons booked | करवीर पतसंस्था अपहार: अध्यक्ष अतुल कारंडे, संचालक मंडळासह ३४ जणांवर गुन्हा

करवीर पतसंस्था अपहार: अध्यक्ष अतुल कारंडे, संचालक मंडळासह ३४ जणांवर गुन्हा

कोल्हापूर : येथील करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेमध्ये झालेल्या १३ कोटी २८ लाख ०१ हजार ८९९ रुपयांच्या अपहार प्रकरणी शुक्रवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात अध्यक्ष अतुल कारंडे याच्यासह संचालक मंडळ व इतर अशा ३४ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. याबाबत सुबराव रामचंद्र पवार रा. मोहिते पार्क रंकाळा यांनी फिर्याद दिली. लोकमतने ऑक्टोबरमध्ये या पतसंस्थेतील गैरव्यवहारावर वृत्तमालिका लिहून पर्दाफाश केला.

करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी पावती वरील रक्कम काढण्यासाठी काही जण गेले असता त्यावरील रक्कम त्यांना दिल्या नाहीत. त्याबाबत फिर्यादी पवार यांच्यासह ठेवीदारांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व ठेवी मिळत नसल्याचे सांगितले. 

त्यावेळी शाखाधिकारी पांडूरंग परीट हे मयत झाल्याने संस्थेचे रेकॉर्ड अपूर्ण असल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर ही वारंवार फिर्यादी पवार तसेच अन्य ठेवीदार संस्थेत ठेव रक्कम काढण्यासाठी गेले असता त्याबाबत अध्यक्ष, मानद सचिव, संचालक, क्लार्क यांनी फिर्यादी व ठेवीदार यांना उडवाउडवीची उत्तरे देवून ठेवी रक्कम परत देण्यास नकार दिला. 

दरम्यान, संस्थेकडून अंतर्गत लेखापरिक्षण करुन घेण्यात आले. त्यामध्ये संस्थेमध्ये ठेवीदारांच्या गुंतविण्यात आलेल्या रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे निदर्शनास आले.

लेखा परिक्षणामध्ये अपहारामधील रक्कमा संस्थेचा शाखाधिकारी संशयीत आरोपी पांडूरंग आण्णाप्पा परीट (सध्या मयत) व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी संगिता पांडूरंग परीट , सुमित पांडूरंग परीट , सुयोग पांडूरंग परीट सर्व रा. कुरुकली, ता. करवीर, इर्शाद अल्लाबक्ष देसाई, शुभम उल्हास लोखंडे, शुभम एकनाथ परीट यांचा संस्थेशी कोणताही संबंध नसताना त्यांच्याशी संगनमत करुन संस्थेची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करुन संस्थेच्या चालू बँक खात्यावरुन रक्कम काढून स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी करुन सर्व ठेवीदारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यांच्यावर झाला गुन्हा नोंद 

पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष अतुल आनंदराव कारंडे, रंगराव आनंदराव पाटील, सागर मारुती पोवार, मानद सचिव मक्तुम अब्दुलसत्तार देसाई, सरदार नानासो जाधव,  अरुण भरतेश्वर मगदूम, परशराम मारुती चहाण, विलास दत्तात्रय राबाडे, सुरेश राघु शेडगे, फिरोजखान मुबारक फरास, कृष्णात पांडूरंग गुरव, संजय गणपती सुतार, विदया शंकर व्हटकर, उर्मिला उत्तम पाटील (गुरव), सुरेश रामगोंडा हासुरे, पांडुरंग आण्णाप्णा परीट (सध्या मयत) महाबीर गोविंद क्षीरसागर, सचिन ज्ञानदेव तारदाळे, महादेव तुकाराम मोरे, महादेव गणपती डोंगळे, उत्तम केशव पाटील, संजय पांडूरंग देसाई, सुधीर अभय मगदुम, प्रभावती सुरेश माने, सुरेखा मनोहर सुतार, संभाजी देसाई, नितीन नारायण चौगले, डी. आर. पाटील, संगिता पांडुरंग परीट , सुमित पांडूरंग परीट, सुयोग पांडूरंग परीट, इर्शाद अल्लावक्ष देसाई, शुभम उल्लास लोखंडे, शुभम एकनाथ परीट आदींचा समावेश आहे.

विश्वासाला तडा

ही पतसंस्था पगारदार नोकरांची आहे. सगळे संचालक जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यामुळे संस्था चांगलीच चालणार या विश्वासाने मुख्यत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपली आयुष्याची सगळी पुंजी या संस्थेत ठेवली आणि संचालक मंडळाच्या गलथानपणामुळे संस्थेत भ्रष्टाचार झाला. जेवढ्या ठेवी तेवढ्या सर्व रक्कमेचा अपहार झाला आहे. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत.

Web Title: Karveer Credit Institution fraud: Chairman Atul Karande, board of directors and 34 persons booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.