करवीरमध्ये काँग्रेस, सेनेचे गड अभेद्य-जिल्हा परिषद विश्लेषण करवीर
By admin | Published: February 24, 2017 10:44 PM2017-02-24T22:44:28+5:302017-02-24T22:44:28+5:30
दक्षिणमध्ये ‘भाजप’चा अमल : जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत भाजपची एंट्री
प्रकाश पाटील -- कोपार्डे --जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्वराज्य संस्थांमध्ये करवीरमध्ये कित्येक वर्षे काँग्रेसचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व राखण्यात काँग्रेसने यश मिळविले असले, तरी मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेनेने, तर आता भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समितीतून ‘एंट्री’ केल्याने काँग्रेसपुढे धोक्याची घंटा आहे.
करवीरची विधानसभा मतदारसंघात दोन विभागांत विभागणी झाली आहे. कोल्हापूर दक्षिण व करवीर असे मिळून करवीरमध्ये ११ जिल्हा परिषद मतदारसंघ, तर २२ पंचायत समिती सदस्य आहेत. करवीर पंचायत समितीचा विचार केल्यास यावर काँग्रेसचेच वर्चस्व असून, याही निवडणुकीत मागीलपेक्षा एक जागा जिंकत काँग्रेस प्लसमध्ये दिसत आहे. मात्र, दक्षिणमधील आमदार सतेज पाटील यांच्या एकहाती वर्चस्वाला आमदार अमल महाडिक यांनी धक्का देऊन गांधीनगर, पाचगाव व निगवे खालसा येथील पंचायत समितींच्या जागा जिंकून प्रथमच पंचायत समितीत प्रवेश केला आहे.
निगवे खालसा, उचगाव व पाचगाव हे सतेज पाटील यांचे बालेकिल्ले असलेले जिल्हा परिषद मतदारसंघ आमदार अमल महाडिक यांनी हस्तगत केले आहेत. मुडशिंगी, उजळाईवाडी जिल्हा परिषद मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांनीच बंडाळी केल्याने हे दोन मतदारसंघ सतेज पाटील यांना राखण्यात यश आले आहे. मागील पंचवार्षिकमध्ये सतेज पाटील यांनी दक्षिणमधील पाच जिल्हा परिषद मतदार संघ व दहा पंचायत समितीत एकहाती वर्चस्व घेताना पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघ बिनविरोध करून इतिहास निर्माण केला होता; पण या वर्चस्वाला भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी सुरुंग लावण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. उजळाईवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार सतेज पाटील यांचे समर्थक व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत
यांच्या पत्नी सारिका या विजयी झाल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. करवीरमध्ये असलेल्या ११ पैकी ६ जिल्हा परिषद मतदारसंघांत आमदार चंद्रदीप नरके व पी. एन. पाटील यांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता. यावेळी आमदार चंद्रदीप नरके किमान एखादी तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीची जागा मिळविणार असे प्राथमिक चित्र होते. यात सेनेला एक जिल्हा परिषद मतदारसंघ गमवावा लागला, तर एक पंचायत समिती मिळविण्यात यश संपादन केले. शिये, वडणगे, जिल्हा परिषद मतदारसंघ सेनेने राखले, पण शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघ अपक्ष उमेदवार रसिका पाटील यांनी जिंकल्याने ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था आमदार नरके यांची झाली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये या मतदारसंघातील शिंगणापूर व
वाकरे पंचायत समिती गण सेनेचे होते. मात्र, काँग्रेसचे अविनाश पाटील यांचा वाकरे गणातील विजय दिलासा देणारा असला तरी जिल्हा परिषदेच्या मतांच्या आकडेवारीत सेना दुसऱ्या व काँग्रेस तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. शिंगणापूर पंचायत समितीमध्ये सेनेचे मोहन पाटील विजयी झाल्याने येथे सेनेची पडझड झाली असली तरी ती मोठी नाही, असे म्हणावे लागेल.
जुन्या सांगरुळ मतदारसंघातील काँग्रेसचे वर्चस्व अबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून, सांगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुभाष सातपुते पाच हजार १०८ व शिरोली पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी चार हजार ९०० इतक्या उच्चांकी मतांनी सेनेच्या उमेदवारावर विजय मिळविल्याने काँग्रेसचा हा गड अबाधित राखला. यानंतर सडोली खालसा, परिते या
जिल्हा परिषद मतदारसंघांत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने भरघोस मताधिक्क्याने विजय मिळविताना शेकापची मुळे उपटून काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
सूर्यवंशी यांना सभापतीसाठी संधी?
राजेंद्र सूर्यवंशी हे पूर्वाश्रमीचे शेकापचे. अलीकडेच त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. एवढेच नाही तर त्यांचा स्वभाव, जनसंपर्क व कामाच्या जोरावर पाच हजारांचे मताधिक्य घेऊन जिल्ह्यात पंचायत समितीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येणारा उमेदवार म्हणून निवडून येण्याचा इतिहास केला आहे.
सूर्यवंशी यांच्यामुळे काँग्रेसची ताकद वाढल्याचे काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्क्यावरून स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय ते सतेज पाटील यांचे जवळचे मानले जातात. यामुळे सतेज व पी. एन. यांचे राजेंद्र सूर्यवंशींना सभापती करण्याबाबत एकमत होईल, असे चित्र आहे.
शिंगणापूर, सांगरुळमधील शिवसेनेचा पराभव नामुष्कीजनक
कुंभी-कासारीच्या आजूबाजूला असणाऱ्या शिंगणापूर व सांगरुळ जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात शिवसेनेची राजकीय ताकद मोठी आहे. कुंभी-कासारी कारखान्याचे दहा संचालक, कुंभी बँकेचे १३ संचालक, एक जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य, अशी मोठी राजकीय ताकद असताना शिंगणापूर पंचायत समिती वगळता व शिंगणापूर जिल्हा परिषद, वाकरे पंचायत समिती, सांगरुळ जिल्हा परिषद व पंचायत समिती, शिरोली पंचायत समितीमध्ये सेनेच्या उमेदवारांचा पराभव नामुष्कीजनक असल्याची राजकीय चर्चा आहे.