विद्यानृसिंह भारतींनी माफी मागावी, अन्यथा..; कोल्हापुरातील राजर्षी शाहूप्रेमींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 11:43 AM2024-02-08T11:43:48+5:302024-02-08T11:43:59+5:30
करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी जातीव्यवस्थेवर केले होते वादग्रस्त वक्तव्य
कोल्हापूर : करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी मनुस्मृतीवर आधारित ब्राह्मणी जातीव्यवस्था टिकली पाहिजे, आरक्षण संपले पाहिजे, असे वक्तव्य केले. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. विद्यानृसिंह भारती यांनी माफी मागावी अन्यथा करवीर पीठावर मोर्चा काढू, असा इशारा राजर्षी शाहूप्रेमींच्या बैठकीत देण्यात आला.
करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी पुण्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कोल्हापुरात उमटत असून राजर्षी शाहूप्रेमींची चित्रदुर्ग मठात बुधवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी सरलाताई पाटील होत्या. गिरीश फोंडे म्हणाले, अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचे धाडस ते करूच शकतात कसे? त्यांच्या मागे कोणती शक्ती कार्यरत आहे हे सांगायला नको. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, विद्यानृसिंहभारती यांना जाब विचारायचा आहे, त्यांना कोल्हापूरकरांचा हिसका दाखवत असताना शाहूंच्या भूमीत शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जिवंत असल्याचे दाखवून देऊया.
जनता दलाचे रवींद्र चव्हाण म्हणाले, विद्यानृसिंहभारती यांच्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करूया. व्यंकाप्पा भोसले म्हणाले, यापूर्वी १९७४ ला तत्कालीन शंकराचार्यांनी असे वक्तव्य केले होते, त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवला होता. ही विचारांची लढाई असून बिंदू चौकात धरणे धरत असतानाच त्यांच्यावर कारवाईसाठी आग्रह धरला पाहिजे. सतीशचंद्र कांबळे, दिलीप सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी, शंकराचार्यांनी माफी मागावी अन्यथा करवीर पीठावर मोर्चा काढण्याचा इशारा देत उद्या पोलिस अधीक्षकांना भेटून गुन्हा दाखल करण्याची मागणी करूया, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी अनिल चव्हाण, बाबूराव कदम, आर.के. पोवार, अशोक भंडारे, शिवाजीराव परुळेकर, संदीप देसाई, दगडू भास्कर, भारती पोवार, टी.एस. पाटील, सीमा पाटील, आदी उपस्थित होते.
शहरात कोपरा सभा घेऊया..
शंकराचार्य काय बोलले? हे सामान्य माणसाला समजले पाहिजे. अन्यथा हिंदुत्ववाद्यांच्या हातात आयते कोलीत मिळेल. यासाठी कोल्हापूर शहरात २५-३० कोपरा सभा घेऊया, अशी सूचना अतुल दिघे यांनी केली.