करवीरमध्ये संजय गांधी योजना समितीच निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:31 AM2020-12-30T04:31:51+5:302020-12-30T04:31:51+5:30
अनेक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत. प्रकाश पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : निराधारांना आधार देण्यासाठी काँग्रेस सरकारने राज्य व केंद्र ...
अनेक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत.
प्रकाश पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : निराधारांना आधार देण्यासाठी काँग्रेस सरकारने राज्य व केंद्र शासनाच्यावतीने संजय गांधी निराधार योजना आणली होती. या योजनेसाठी प्रत्येक तालुक्यात एक अशासकीय समिती असते. या समितीकडून समाजातील निराधार व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना या योजनेतील विविध पेन्शन योजनांचा लाभ मिळवून द्यावयाचा असतो. पण करवीर विधानसभा निवडणुकीनंतर एक वर्ष झाले तरी संजय गांधी योजना समिती अध्यक्ष निवड झालेली नाही. त्यामुळे अनेक गरजू निराधारांचे प्रस्ताव प्रतीक्षेत आहेत.
निराधारांना आधार देण्यासाठी संजय गांधी सर्वसाधारण व मागासवर्गीय निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी परितक्त्या, विधवा व अपंग योजना योजना अशा योजना राबविण्यात येत आहेत. प्रतिमहा यातील प्रत्येक लाभार्थ्यांना एक हजार पेन्शन शासन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करते.
संजय गांधी निराधार योजनेसाठी अध्यक्षासह आठ समिती सदस्य असते. या सदस्यांनी सामाजिक कर्तव्य समजून समाजातील वंचित व निराधार लोकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करावयाचे असतात. प्रत्येक तीन महिन्याला यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या बैठकीत सादर झालेले प्रस्ताव सादर करून, त्याची छाननी केली जाते पण संजय गांधी योजना समिती अध्यक्ष निवड एक वर्षापासून झालीच नसल्याने प्रस्ताव कोणाकडे आणि कसे सादर करावयाचे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
करवीर तालुक्यातील संजय गांधी समिती अस्तित्वात नसल्याने या योजनेतून पेन्शन मिळण्यासाठी जे प्रस्ताव द्यावे लागणार त्यासाठी लागणारे फॉर्म आणि ते सादर कुठे करावे यासाठी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक निराधार, विधवा, परितक्त्या अपंग व वृद्ध प्रस्ताव दाखल करणे व मंजुरी मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
संगायो समिती अध्यक्षासाठी अनेकांची फिल्डिंग
संगायो समितीसाठी ज्या-त्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना अध्यक्ष निवडीचा अधिकार असतो. आमदार आपल्या जवळच्या व सामाजिक कामात रस असणाऱ्या कार्यकर्त्याची यासाठी वर्णी लावतात व जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजनेतून पेन्शन लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असतात. सध्या करवीरच्या संगायो समितीच्या अध्यक्षपदावर वर्णी लागावी म्हणून अनेक काँग्रेस कार्यकर्ते इच्छुक असल्याचे चित्र आहे.