प्रधानमंत्री महाआवास योजनेत करवीर तालुक्याची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:22 AM2021-03-28T04:22:35+5:302021-03-28T04:22:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा: घरकूल आवास योजनेत जिल्ह्यात करवीर तालुक्याने तब्बल २ हजार ९३२ घरकुलांना मंजुरी घेऊन आघाडी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा:
घरकूल आवास योजनेत जिल्ह्यात करवीर तालुक्याने तब्बल २ हजार ९३२ घरकुलांना मंजुरी घेऊन आघाडी घेतली आहे, असे प्रतिपादन करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी केले. ते प्रधानमंत्री महाआवास अभियानांतर्गत लाभार्थ्यांना घरकूल प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी करवीर पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील होत्या.
यावेळी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे, उपसभापती अविनाश पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. उगले म्हणाले, करवीर तालुक्यात २०१६ पासून आवास योजनेचे काम सुरू आहे. आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेच्या १२०३, रमाई आवास योजनेच्या १६११, शबरी आवास योजनेच्या १३, पारधी आवास योजनेच्या ७ तर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या ९८ अशा २९३२ घरकुलांना मंजुरी दिली. तसेच २० नोव्हेंबर ते ३१ मार्च अखेर महाआवास अभियान राबवण्यात आले. त्यामध्ये ६५९ घरकुलांना मंजुरी दिली.
याशिवाय तालुक्यात स्वच्छ भारत मिशन, सौभाग्य योजना वीजजोडणी, उज्ज्वला योजना गॅस कनेक्शन आदी लोककल्याणकारी योजनाही चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्या. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यामुळे तालुक्याला या योजना मंजूर करताना अतिरिक्त फायदा झाला असल्याचेही उगले यांनी स्पष्ट केले. उपसभापती अविनाश पाटील यांनीही आपल्या भाषणात या योजनेबाबतचे फायदे व येणाऱ्या अडचणी नमूद केल्या. पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, सुनील पोवार, यशोदा पाटील, अर्चना खाडे, अश्विनी धोत्रे, शोभा राजमाने, विजय भोसले, मोहन पाटील, सागर पाटील, मंगल पाटील, सविता पाटील, सहायक गटविकास अधिकारी शरद भोसले, कृष्णा धोत्रे आदी उपस्थित होते.
योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करा...
घरकूल योजनेच्या मंजूर यादीत एखाद्या लाभार्थ्याचे नाव नसले की तो तक्रार करतो. वास्तविक अशा लाभार्थ्याने कागदपत्रांची पूर्तता केलेली नसते. त्यामुळे लाभार्थ्याने योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करावी व घरकूल योजनेची मंजुरी घ्यावी, असे आवाहन अनेक सदस्यांनी केले.
............................................
२७ बावडा
फोटो: करवीर पंचायत समितीच्या वतीने प्रधानमंत्री आवास अभियानांतर्गत वडकशिवालेचे घरकूल लाभार्थी मारुती पारळे यांना करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी करवीर पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, उपसभापती अविनाश पाटील, गटविकास अधिकारी जयवंत उगले, सहायक गटविकास अधिकारी शरद भोसले आदी उपस्थित होते.
(फोटो:रमेश पाटील,कसबा बावडा )