करवीर तालुक्यात ८७.६१ टक्के चुरशीने मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:06+5:302021-01-16T04:29:06+5:30
**मतदारांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते व गटनेत्यांमध्ये चुरस लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : करवीर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळपासून शांततेत; ...
**मतदारांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते व गटनेत्यांमध्ये चुरस
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : करवीर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळपासून शांततेत; पण चुरशीने ८७.६१ टक्के मतदान झाले. १ लाख ११ हजार ७७४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रत्येक गावात सकाळपासून मतदारांच्या रांगाच रांगा मतदान केंद्रांवर दिसत होत्या. मतदारांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते व गटनेत्यांमध्ये चुरस सुरू होती. दुपारी ३.३० वाजेपर्यंत करवीर तालुक्यात ७९ टक्के मतदान झाले होते. यावरून मतदारांमध्ये उत्साह दिसत होता.
करवीरमध्ये आज ५४ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला काही गावांत व्होटिंग मशीन सुरू करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या; पण केंद्राधिकाऱ्यांनी त्या दूर केल्याने मतदान प्रक्रियेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. गिरगाव व भामटेत दोन तास व्होटिंग मशीन बंद पडले, तर कोपार्डे येथे बँलेट मशीन बदलण्यात आले. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगा दिसत होत्या. उमेदवारांनी मतदारांना मतदानासाठी केंद्रावर आणण्यासाठी गाड्यांची सोय केली होती.
करवीरमध्ये १,२४७ जागांपैकी ७८ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. १,१७१ उमेदवारांचे नशीब आज (शुक्रवार, दि.१५) मतपेटीत बंद झाले आहे. करवीर तालुक्यात महिला ६० हजार ८६४ व पुरुष ६६ हजार ७१८ मतदान आहे. पाच गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने ४९ ग्रामपंचायतींच्या १९१ प्रभागांत निवडणूक होणार आहे. १ लाख २७ हजार ५८५ मतदार आहेत. पैकी ८७.६१ टक्के मतदान झाले.
बालिंगा येथे आदर्श मतदान केंद्र
बालिंगा येथे प्रशस्त मंडप घालून मतदान केंद्र सजवण्यात आले होते. येथे दर निवडणुकीप्रमाणे मतदारांसाठी सर्व मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.
कोपार्डे येथे वादावादी
कोपार्डे येथे बोगस मतदान झाल्याच्या संशयावरून वादावादी सुरू झाली. हा गोंधळ अर्धा तास सुरू होता. यावेळी दोन विरोधक महिला उमेदवारांच्या पतींमध्ये चांगलीच जुंपली; पण पत्रकार व पोलिसांनी मध्यस्थी करून या वादावर पडदा पाडला.
करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचा लेखाजोखा
बिनविरोध - ५
बिनविरोध सदस्य - ७८
----------------- --------------------- -------
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती - ४९
एकूण मतदान - १,२७,५८५
प्रभाग - २०५
सदस्य - १,१७१
झालेले मतदान १,११,७७४
टक्केवारी - ८७.६१
__________ ____________ _________
(फोटो कॅप्शन)
१) खुपिरे (ता. करवीर) येथे आपल्या गटाचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी फेटे व गांधी टोपी घालून रांगेने उभे.