करवीर तहसिलची पाच मजली इको-फ्रेंडली इमारत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:42+5:302021-03-13T04:41:42+5:30
कोल्हापूर : करवीर तहसील कार्यालय आणि करवीर पोलीस ठाण्याच्या या परिसरातील हेरिटेज इमारतींचा समन्वय साधून नवी इमारत उभारण्यात यावी, ...
कोल्हापूर : करवीर तहसील कार्यालय आणि करवीर पोलीस ठाण्याच्या या परिसरातील हेरिटेज इमारतींचा समन्वय साधून नवी इमारत उभारण्यात यावी, अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी अधिकाऱ्यांना गुुरुवारी केली. शासनाने करवीर तहसिल व पोलीस ठाण्याच्या एकत्रित इमारतीसाठी १४ कोटी ९८ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून सध्याच्याच जाग्यावर पाच मजली इको-फ्रेंडली इमारत होणार आहे. खूप वर्षापासून रखडलेला हा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे काम कोणत्याही अडचणीशिवाय कसे तातडीने पूर्ण करता येईल, यासंबंधीच्या सूचना दिल्या. भाऊसिंगजी रोडवरील करवीर तहसील कार्यालय व करवीर पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची समस्या होतीच; शिवाय ही इमारत जुनी झाली असून, प्रशासकीय कामासाठी ती अपुरी पडत होती. करवीर तालुका लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असून शहरातील उपनगरेही यात येत असल्याने या कार्यालयात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी सुसज्ज इमारत असावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निधी देण्याची मागणी केली होती. आमदार ऋतुराज पाटील यांनीही पाठपुरावा केला. इमारतीच्या कामाला प्रशासकीय मान्यताही मिळाली असून कामाचे टेंडर होऊन बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
---
अशी असेल इमारत
एकूण मजले : ०५
मंजूर रक्कम : १४ कोटी ९८
पार्किंग व्यवस्था : २ मजले
फोटो नं ११०३२०२१-कोल-ऋतुराज पाटील
ओळ : करवीर तहसिल कार्यालयाच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाबाबत गुरुवारी आमदार ऋतुराज पाटील यांनी जागेवर जाऊन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली व विविध सूचना केल्या.
---