कार्वेचे जवान राजेंद्र तुपारे शहीद
By Admin | Published: November 7, 2016 01:03 AM2016-11-07T01:03:39+5:302016-11-07T01:03:39+5:30
पाकचा सीमेवर गोळीबार : पंजाबच्या जवानालाही वीरमरण; तीन जवान, दोन महिला जखमी
श्रीनगर : काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून झालेले शस्त्रसंधीचे प्रयत्न हाणून पाडताना नायक राजेंद्र नारायण तुपारे (वय ३२) आणि शिपाई गुरसेवक सिंग हे भारतीय लष्कराचे दोन जवान रविवारी शहीद झाले. राजेंद्र तुपारे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे गावचा सुपुत्र होते, तर गुरसेवक सिंग पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील वारणा गावचे होते.
भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’नंतरही काश्मीरमध्ये अतिरेकी घुसविण्याची पाकिस्तानची कारस्थाने अजूनही सुरु आहेत. पुंछ सेक्टर आणि कृष्णा घाटी येथे सीमेवरून अतिरेक्यांना घुसता यावे यासाठी पाकिस्तानी सैनिकांनी जोरदार गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराने त्यास जोरदार प्रत्युत्तर देत हे दोन्ही प्रयत्न हाणून पाडले. एवढेच नव्हे तर प्रतिहल्ला करून सीमेच्या पलीकडील पाक चौक्यांचे मोठे नुकसानही केले.
मात्र या धुमश्चक्रीत कृष्णा घाटी येथे शिपाई गुरचरण सिंग व पुंछ सेक्टरमध्ये राजेंद्र तुपारे गंभीर जखमी झाले व नंतर त्यांचे निधन झाले. पूंछ सेक्टरमध्ये (पान १ वरून) पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या तोफांच्या माऱ्यात सलीमा अख्तर व झरीफा बेगम या दोन स्थानिक नागरिक जखमी झाल्या.बीएसएफचे उपनिरीक्षक नितीन कुमार हे जखमी झाले असून त्यांना सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे सिमेवर तणाव आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेजवळ शंभरहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. आंतरराष्ट्रीय सिमेवर आतापर्यंत पाकिस्तानच्या गोळीबारात १८ जण मारले गेले आहेत. यातील १२ नागरिक आहेत. तर, ८३ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
कारगिलनंतर काश्मीरमध्ये
४,६७५ जवानांना हौतात्म्य
सन २००१ मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये एकूण ४,६७५ जवान शहीद झाल्याची माहिती भारतीय लष्कराने माहिती अधिकार कायद्यान्वये केलेल्या अर्जाच्या उत्तरात दिली आहे. यात नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामान यामुळे मरण पावलेल्या जवानांचा समावेश नाही. बडोदा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते पंकज दारवे यांनी केलेल्या अर्जावर लष्कराने अशीही माहिती दिली की, सन २००१ नंतर पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यासारख्या ७,९०८ दहशवादी घटना घडल्या व त्यात १,१७४ लष्करी जवान शहीद झाले.
३०० दहशतवादी सक्रिय
हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर निर्माण झालेल्या अशांततेची तीव्रता व व्याप्ती कमी झाल्यालासरखे वाटत असले तरी परिस्थिती नाजूक आहे व राज्यात अजूनही सुमारे ३०० जहशतवादी सक्रिय आहेत, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक के. राजेंद्र यांनी सांगितले. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीमगरमध्ये घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत राजेंद्र म्हणाले की, सीमेवरून नियमितपणे होणारी घुसखोरी ही चिंतेची बाब असून त्यामुळे परिस्थिती केव्हाही बदलू शकेल. (वृत्तसंस्था)
चंदगडवर शोककळा; मंगळवारी अंत्यसंस्कार
चंदगड : सीमेवर राजेंद्र तुपारे शहीद झाल्याचे वृत्त समजताच चंदगड तालुक्यासह मजरे-कार्वे गावावर शोककळा पसरली. लष्करी अधिकाऱ्यांनी तुपारे यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून ही माहिती दिली.
राजेंद्र तुपारे यांचा कार्वे येथे १९८३ मध्ये जन्म झाला. बारावीमध्ये असतानाच २००२ मध्ये ते सैन्यात २२ मराठा रेजिमेंटमध्ये भरती झाले. त्यांनी १४ वर्षे सैन्यात देशभर विविध विभागांत सेवा केली. राजेंद्र यांचे २००६ मध्ये गावातीलच शर्मिला यांच्याशी विवाह झाला. त्यांना आर्यन (वय ९) व वैभव (५) ही दोन मुले आहेत. त्यांचा एक भाऊ शिक्षक असून, दुसरे भाऊ शेती करतात.
गावात त्यांचे आई-वडील, बहीण, सासरे राहतात, तर दोन मुलांच्या शिक्षणासाठी पत्नी शर्मिला बेळगाव शहरात विजयनगर येथे सध्या राहतात. आॅगस्टमध्ये गणशोत्सवास एक महिन्याच्या सुटीवर ते आले होते. यापूर्वी या गावातील मनोहर हरकारे हा जवानही शहीद झाला होता.
मंगळवारी अंत्यसंस्कार
शहीद राजेंद्र तुपारे यांचे पार्थिव उद्या, सायंकाळी पूंछ येथून विमानाने पुणे येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर खास हेलिकॉप्टरमधून बेळगाव येथे आणि तेथून चंदगड तालुक्यात मजरे-कार्वे गावी आणण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. ८) शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
-----------
मुलाच्या वाढदिनीच होणार अंत्यसंस्कार
शहीद राजेंद्र तुपारे यांचा मोठा मुलगा आर्यन याचा मंगळवारी (दि. ८) वाढदिवस आहे. या वाढदिनी आर्यन याला राजेंद्र यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच पत्नी शर्मिला हिला मुलग्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करा, असा निरोपही दिला होता. मात्र, मुलाच्या वाढदिनादिवशीच राजेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.
------------
अंत्यसंस्कारासाठी शासकीय यंत्रणा सज्ज
शहीद राजेंद्र तुपारे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी मजरे-कार्वे गावात आणण्यात येणार आहे. अंत्यदर्शनासाठी महात्मा फुले विद्यालयाच्या पटांगणावर पार्थिव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार असल्याने त्याची पाहणी करण्यासाठी रात्री उशिरा तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, नायब तहसीलदार आर. टी. झाजरी, पोलिस निरीक्षक महावीर सकळे व बेळगाव येथील मराठा रेजिमेंटचे अधिकारी यांनी गावात येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.