Kirnotsav: अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहोचली सूर्यकिरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 02:04 PM2024-11-09T14:04:19+5:302024-11-09T14:05:21+5:30
किरणोत्सवाला तीन मिनिटे आधीच प्रारंभ : हवेतील आर्द्रता योग्य प्रमाणात
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई दक्षिणायन किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी ढगांचा अडथळा न आल्याने मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहोचली. हवेतील आद्रेतेचे प्रमाणही ४० टक्के म्हणजे योग्य असल्यामुळे किरणे महाद्वारातून आत येत शेवटी देवीच्या कमरेपर्यंत पोहाचली. गरुड मंडपाची कमान नसल्यामुळे यंदा किरणोत्सव तीन मिनिटे आधीपासूनच अनुभवता आला, हे विशेष. यामुळे दोनशे वर्षांपूर्वी किरणोत्सवाची स्थिती कशी असेल याचा अभ्यास यंदा अभ्यासकांना नोंदवता आला.
दक्षिणायणाच्या कालखंडातील किरणोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. सायंकाळी ४ वाजून ५७ मिनिटांनी सूर्यकिरणे पश्चिमेकडील महाद्वारातून मंदिराच्या दिशेने गरुड मंडपाच्या मागे आली. ५ वाजून ०१ मिनिटांनी किरणांनी चबुतरा पार केला. ५ वाजून २३ मिनिटांनी किरणे गणपती मंदिरापर्यंत चौकात पोहोचली. ५ वाजून ३० मिनिटांनी सूर्यकिरणांनी गरुड मंडप गाठले. किरणांनी ५ वाजून ३४ मिनिटांनी चांदीचा उंबरा पार केला. यानंतर ५ वाजून ३९ मिनिटांनी किरणे गाभाऱ्यापर्यंत पोहोचली. ५ वाजून ४१ मिनिटांनी सूर्यकिरणे मूर्तीच्या चरणाखाली असलेल्या कटांजनापर्यंत पोहोचली होती. ५ वाजून ४३ मिनिटांनी किरणांनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला. ५ वाजून ४५ मिनिटांनी किरणे गुडघ्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर ५ वाजून ४७ मिनिटांनी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली आणि डावीकडे लुप्त झाली.
यावेळी सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र अभ्यासक गणेश नेर्लीकर-देसाई, विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक, किरणोत्सव अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर, सुदर्शन निवास कुटाले उपस्थित होते. गुरुवारपेक्षा शुक्रवारी किरणांची तीव्रता चांगली होती त्यामुळे यावेळी, किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल, अशी अपेक्षा खगोल अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी व्यक्त केली.
किरणोत्सवादरम्यान आता एकच अडथळा बाकी
किरणोत्सव मार्गातील बहुतांशी अडथळे देवस्थान व्यवस्थापन समितीने यापूर्वीच काढलेले आहे. महाद्वाराजवळील आणखीन एक अडथळा या किरणोत्सवावेळी उपस्थित असलेल्या महापालिकेच्या शाखा अभियंता अभिलाषा दळवी यांच्या लक्षात आणून दिला असून तो काढण्यात येणार आहे.
स्वच्छ वातावरणाची साथ
स्वच्छ वातावरण आणि निरभ्र आकाशामुळे शनिवारी किरणोत्सवाची तीव्रता चांगली होती. गाभाऱ्यातील आर्द्रता ३५ च्या आत होती. आता देवीच्या खांद्यापर्यंत, त्यानंतर मुखकमल, खांद्यावर आणि शेवटी चरणस्पर्श होऊन या सोहळ्याची सांगता होईल, असे प्रा. कारंजकर म्हणाले.