गोव्याच्या मंत्र्यांच्या अभिनयाला करवीरकरांची दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 03:36 PM2019-11-08T15:36:31+5:302019-11-08T15:37:53+5:30
गोवा सरकारमधील कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या अभिनयाला करवीर रसिकांनी मोठी दाद दिली. प्रतिज्ञा नाट्यरंगच्या तीन दिवसांच्या कलामहोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी त्यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’मधील छत्रपती संभाजी महाराजांची तडफदार भूमिका साकारली.
कोल्हापूर : गोवा सरकारमधील कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या अभिनयाला करवीर रसिकांनी मोठी दाद दिली. प्रतिज्ञा नाट्यरंगच्या तीन दिवसांच्या कलामहोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी त्यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’मधील छत्रपती संभाजी महाराजांची तडफदार भूमिका साकारली.
केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये गेले तीन दिवस हा महोत्सव सुरू होता. अखेरच्या दिवशी घोणशी, बांदोडा फोंडा येथील श्री विठोबामारूती देवस्थानच्या वतीने या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकामध्ये गावडे हेच प्रमुख भूमिकेत असून, ते गोवा सरकारचे कला व सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्या रंगमंचावरील एन्ट्रीलाच रसिकांनी टाळ्या वाजविल्या.
रवींद्र नाईक यांनी दिग्दर्शन केले असून, गिरीश वेळगेकर, महेश शीलकर, रतिष गावडे, सर्वानंद कुर्पासकर, मिलिंद बांदोडकर, नम्रता नाईक, प्रशांत वझे, दिलेश कोलवेकर, ईश्वर नाईक, संदीप फडते, गजानन नाईक, केदार गावडे, अमोल नाईक यांनीही या नाटकामध्ये भूमिका साकारल्या.
मध्यंतरावेळी मंत्री गोविंद गावडे, कार्यक्रम अधिकारी गोविंद शिरोडकर, गोव्याचे नाट्यकर्मी भालचंद्र उसगावकर यांच्यासह कोल्हापूरचे प्रतिज्ञाचे प्रशांत जोशी, रमेश सुतार, प्रेषित शेंडगे, मिलिंद अष्टेकर, सुनील घोरपडे यांचाही यावेळी गोवा सरकारच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रशांत जोशी यांच्या प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीने तीन दिवसांच्या या कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला गोवा शासनाच्या कला व सांस्कृतिक विभागाने सहकार्य केले होते. या तीनही दिवसांच्या कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या तीनही कार्यक्रमांदरम्यान गरजूंना मदत करण्यात आली.