'आली डोंगरची मैना, खायला एवढाच महिना'; करवंदे, जांभळे बाजारपेठात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 06:02 PM2022-05-21T18:02:33+5:302022-05-21T18:02:55+5:30
अनिल पाटील सरुड : सध्या करवंदे, जांभळे या सह्याद्रीच्या डोंगर कपारीतील रानमेव्याचा हंगाम सुरु आहे. ग्रामीण भागात अनेक स्री, ...
अनिल पाटील
सरुड : सध्या करवंदे, जांभळे या सह्याद्रीच्या डोंगर कपारीतील रानमेव्याचा हंगाम सुरु आहे. ग्रामीण भागात अनेक स्री, पुरुष डोक्यावर रानमेव्याची पाटी घेऊन रखरखत्या उन्हामध्ये हा रानमेवा विकण्यासाठी गावो गावी फिरु लागले आहेत. त्यामुळे 'आली डोंगरची मैना खायाला एवढाच महिना ' करवंद घ्या करवंद अशा रानमेवा विक्रेत्यांच्या आरोळ्या शाहूवाडी तालुक्यातील गावा गावामधील गल्ली बोळात एैकवयास मिळत आहेत.
शाहूवाडी तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे सह्यादीच्या डोंगररांगाचा भाग हा रानमेव्यांचा आगार म्हणून ओळखला जातो. या भागात करवंदाच्या जाळ्या व जांभळाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या भागातील हवामान हे नेहमीच रानमेव्यासाठी पोषक असते. सध्या रानमेव्याचा हंगाम चांगलाच बहरलेला दिसत आहे.
उदरनिर्वाहासाठी विना भांडवली व्यवसायाचा आधार
या भागातील वाड्या वस्त्यावरील लोकांना पावसाळा सुरु होईपर्यंत कामधंद नसल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांना हा रानमेवा विक्रीच्या विना भांडवली व्यवसायाचा आधार घ्यावा लागतो. झाडाझुडपातील करवंदाच्या जाळ्यामधुन करवंदे तोडुन ती विकण्यासाठी परगावी अथवा बाजारपेठामध्ये आणली जातात. तसेच महामार्गालगतच्या रस्त्याकडेलाही हा रानमेवा विक्री करण्यासाठी विक्रेते दिवसभर ठाण मांडून बसुन असतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच आपल्या कुंटुबियाचा या दिवसातील उदरनिर्वाह चालवतात.