कोल्हापूरचे कास पठार; किटवडेत बहरला रानफुलांचा सुगंध, विविध प्रजातींच्या फुलांनी पर्यटक आकर्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:10 PM2023-09-13T12:10:31+5:302023-09-13T12:12:56+5:30

प्रतिचेरापुंजी म्हणून ओळख असलेले पावसाचे गाव

Kas Plateau of Kolhapur; The fragrance of wild flowers blooms in Kitwade in Ajraj, tourists are attracted by different species of flowers | कोल्हापूरचे कास पठार; किटवडेत बहरला रानफुलांचा सुगंध, विविध प्रजातींच्या फुलांनी पर्यटक आकर्षित

कोल्हापूरचे कास पठार; किटवडेत बहरला रानफुलांचा सुगंध, विविध प्रजातींच्या फुलांनी पर्यटक आकर्षित

googlenewsNext

सदाशिव मोरे

आजरा : औषधी वनस्पती, मुबलक जैवविविधता व निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेला आजरा तालुका आहे. पावसाळ्यात दररोज अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्याने प्रती चेरापुंजी म्हणून ओळख असलेला किटवडेचा सडा सध्या रंगीबेरंगी रानफुलांनी बहरला आहे. कोल्हापूरचे प्रती कासपठार म्हणून याठिकाणाची ओळख होत आहे. विविध प्रजातीची ही रानफुले आपल्या मनमोहक सुगंधाने पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.

आजरा तालुक्याला निसर्गाची अव्दितीय जैवविविधता लाभली आहे. स्थानिक नागरिकांनी मिळालेली निसर्गसंपदा सुस्थितीत आजपर्यंत राखून ठेवली आहे. त्यामुळे येथील परिसरात दुर्मिळ ते अतिदुर्मिळ जलचर, उभयचर प्राणी, वनस्पती, पक्षी, कीटक, रानफुली रानभाज्या व रानफळे सहज आढळून येतात. त्यामुळे किटवडे ( ता . आजरा ) परिसर पर्यटकांबरोबरच, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी यांना आकर्षित करीत आहे.

आजरा आंबोली रस्त्यावर घाटकरवाडीपासून तीन कि.मी.अंतरावर हा किटवड्याचा सडा आहे. या ठिकाणी आता पांढरी, निळसर, पिवळी, गुलाबी अशा विविध प्रकारची रानफुले बहरली आहेत. म्हणूनच जैवविविधतेने समृद्ध असलेले गाव म्हणून किटवडेचा उल्लेख राज्यभर केला जातो.

पठारावर फुललेली प्रजातीनुसार रानफुले

सीतेची आसवे असणारी निळसर फुले, सोनसळीची पिवळी फुले, गुलाबी तेरडा, पेवची पांढरी फुले, भुई चापा, अत्तर काढण्यासाठी वापरली जाणारी सुरंगीची फुले, सुंदर वास असणारी अंजनीची निळसर फुले. तर सात वर्षांनी फुललेली बकरा वनस्पतीची फुले यांचा मनमोहक असा सडा जवळपास ५० ते ६० एकरमध्ये बहरला आहे.

शेकडो प्रकारच्या उपलब्ध रानभाज्या

भारंगी, पात्री, कर्टुली, वाघाटी, आळंबी, नाली, अकुरवेल, आधाळी, फिरशी, चिवारी, कचर, लोकेरी, काकडी सारखी गोमटी भाजी या रानभाज्या या परिसरात उपलब्ध आहेत. पावसाळ्यात चार महिने पावसाने गावाचा संपर्क तुटल्यानंतर नागरिकांना या भाज्यांवरच अवलंबून राहावे लागते.

परिसरात वावर असणारे जंगली प्राणी

हत्ती, गवे, साळींदर, डुक्कर, भेकर, कोल्हे, लांडगे, वाघ, बिबट्या, ब्लॅक पॅंथर,  काळवीट अशा प्रकारचे प्राणी या भागात दररोज शेतकऱ्यांना दिसतात.

किटवडे परिसरातील औषधी वनस्पती

अमृता, नरक्या, हिरडा, बेहडा, कुंभ, कोकम, दातपडी, रताळे, हाडसांदी, मालेबंद, दूधगर्भणी, शिकेकाई,तमालपत्री, मिरी यासह ३० ते ३५ औषधी वनस्पती सापडतात.

प्रतिचेरापुंजी म्हणून ओळख असलेले पावसाचे गाव

समुद्रावरून येणारा पाऊस किटवड्याच्या सड्यावर आदळून पडतो. दररोज १५० ते २०० मि.मी. पाऊस होतो. चेरापुंजी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने किटवडेची ओळख प्रतीचेरापुंजी अशी आहे.

Web Title: Kas Plateau of Kolhapur; The fragrance of wild flowers blooms in Kitwade in Ajraj, tourists are attracted by different species of flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.