कसबा बावड्यात घरफोडी, सहा तोळे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 06:37 PM2017-09-06T18:37:50+5:302017-09-06T18:37:54+5:30
निवारा कॉलनी, कसबा बावडा येथील बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्याचे सहा तोळे दागिने लंपास केल्याचे मंगळवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आले. घरफोडीमुळे नागरिकांत भीती पसरली आहे.
कोल्हापूर : निवारा कॉलनी, कसबा बावडा येथील बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्याचे सहा तोळे दागिने लंपास केल्याचे मंगळवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आले. घरफोडीमुळे नागरिकांत भीती पसरली आहे.
संजीवनी संजय सुतार (वय ३८) ह्या दोन मुलांसह या ठिकाणी राहतात. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. दि. ३१ आॅगस्ट २०१७ रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे त्या केर्ली (ता. करवीर) येथे माहेरी मुलांसह गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी परत कसबा बावडा येथील घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटलेला दिसला.
आतमध्ये जाऊन पाहिले असता कपाटातील सोन्याचे दागिने ठेवलेला डबा रिकामा होता. त्यामध्ये चार तोळ्यांचे गंठण, एक तोळ्याचे लहान गंठण, अंगठी व कर्णफुले असे सहा तोळ्यांचे दागिने होते. त्यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे.
मजुरीची कामे करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. अशा परिस्थितीत चोरट्याने दागिने लंपास केल्याने सुतार कुटुंबीय हतबल झाले आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत नोंद झाली आहे. भरवस्तीत घरफोडीच्या प्रकाराने नागरिकांत भीती पसरली आहे.