कसबा बावड्यात आॅर्डर, आॅर्डर...!
By Admin | Published: February 9, 2016 12:39 AM2016-02-09T00:39:33+5:302016-02-09T00:46:52+5:30
पक्षकार, वकिलांची लगबग : जुन्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात नीरव शांतता
कोल्हापूर : कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळील नव्यानेच उभारण्यात आलेल्या न्यायसंकुलाचे रविवारी दिमाखात उद्घाटन झाले अन् सोमवारपासून न्यायदानाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. नव्या इमारतीच्या आकर्षक बांधकामामुळे सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरील औत्सुक्याचे भाव पाहायला मिळत होते; तर दुसरीकडे नेहमी गजबजलेल्या सीपीआर परिसरात गर्दीअभावी थोडीशी उसंत, तर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात निरव शांतता पाहायला मिळाली. त्यामुळे या परिसरात दररोज पाहायला मिळणारी वाहतुकीची कोंडी मात्र सोमवारी अभावानेच पाहायला मिळाली.
भाऊसिंगजी रोडवर असलेले जिल्हा व सत्र न्यायालयातील कौटुंबिक न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालये नूतन न्यायसंकुलामध्ये स्थलांतर करण्यात आली आहेत. सुबक बांधकाम आणि चार मजली अशी ही भव्य इमारत आहे. सोमवारी पहिल्या दिवशी सकाळपासून पक्षकार, वकील या न्यायसंकुलात कामकाजासाठी येऊ लागले. मात्र, कोणता विभाग कोठे आहे, कितव्या मजल्यावर आहे, हे समजत नव्हते.
काही पक्षकार तर कठड्याचा आधार घेऊन बसले होते. पक्षकारांबरोबर त्यांचे वकीलही तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर ये-जा करत होते. त्यांचीही पक्षकारांबरोबर दमछाक होत होती. प्रत्येक पोलीस ठाण्याचे न्यायालयीन कामकाज पाहणारे पोलीस कॉन्स्टेबलही याठिकाणी थांबून होते. याचबरोबर ज्येष्ठ वकील यांच्यासह शिकाऊ वकील हे पक्षकारांसोबत चर्चा करत थांबले होते. काही वकिलांनी तर आपल्या मोबाईलमध्ये नव्या इमारतीच्या पायऱ्यांवर उभारून सेल्फी काढली.
कसबा बावडा येथील नवीन न्यायसंकुलात उपाहारगृहाची सोय नसल्यामुळे पक्षकार, वकिलांनी न्यायालयाबाहेरील चहा टपऱ्यांचा आधार घेत दिवस काढला. न्यायसंकुलात सकाळपासून सुरू असलेली गजबज दुपारनंतर थोडी-थोडी कमी झाली.
दुसरीकडे, सीपीआर समोरील जुन्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात दररोज असणारी पक्षकारांची, वकिलांची गर्दी, वाहतुकीची कोंडी सोमवारी मात्र पाहायला मिळाली नाही. जिल्हा व सत्र न्यायालय स्थलांतर झाल्याने भाऊसिंगजी रोड व चिमासाहेब महाराज चौकात वाहनांचा भार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे पहायला मिळाले. (प्रतिनिधी)