कसबा बीडच्या गणेश तलावाला केंदाळाचा वेढा!

By admin | Published: September 17, 2015 09:53 PM2015-09-17T21:53:06+5:302015-09-18T23:41:50+5:30

अकराव्या शतकाचा साक्षीदार : पाणी बनले दूषित, वाढत्या अतिक्रमणामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात

Kasba Beed's Ganesh Talawar Center siege! | कसबा बीडच्या गणेश तलावाला केंदाळाचा वेढा!

कसबा बीडच्या गणेश तलावाला केंदाळाचा वेढा!

Next

शिवराज लोंढे -- सावरवाडी  --अकराव्या शतकात भोज राजाने बांधलेल्या आणि प्राचीन ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कसबा बीड (ता. करवीर) गावच्या प्राचीन तलावाची सध्या अवस्था बिकट झाली आहे. तलावात वाढत्या जलपर्णीने वेढा दिला आहे. केंदाळ, पान वनस्पती, गारवेलीचे वाढते साम्राज्य यामुळे पाणी दूषित बनले आहे. तलावाभोवती वाढत्या आक्रमणामुळे भविष्यात या गणेश तलावाचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अकराव्या शतकात भोज राजाने या तलावाची उभारणी केली. त्या काळात या तलावाचा जनतेने पिण्यासाठी पाण्याचा वापर केला होता. कालांतराने या तलावाची देखभाल करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले.सर्व्हे नंबर २२१/१ मधील सोळा एकर क्षेत्राच्या परिसरात या गणेश तलावाची उभारणी केली आहे. तलावामध्ये गेल्या ३० वर्षांपासून प्रचंड स्वरूपाचा गाळ साचलेला आहे. गाळामुळे तलावातील पाणी दूषित बनल्याने दुर्गंधीयुक्त हवामान निर्माण झाले आहे. तलावामध्ये गेल्या २५ वर्षांपासून पान वनस्पती, जलपर्णी, केंदाळाचे साम्राज्य वाढलेले आहे. तलावाच्या पश्चिम बाजूला गारवेली वाढलेल्या आहेत. तलावाच्या पूर्वेस दगडी भराव बांधलेला होता; पण त्याचीही कालांतराने पडझड झाली होती. तलावासभोवार अतिक्रमणे वाढलेली आहेत.पूर्वी तलावातील पाण्याचा वापर शेतीसाठी व मच्छ व्यवसायासाठी केला जात होता; पण शासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या या गणेश तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
गणेश तलावाला अद्याप शासकीय निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे या परिसराचा गेली कित्येक वर्षे विकास खुंटलेला आहे. राज्य शासनाने कसबा बीड नगरीला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा दिला; पण शासकीय निधीअभावी अनेक कामे ठप्प झाली आहेत. गणेश तलाव परिसरात मिनी रंकाळ््याचे स्वप्न अधुरे राहिले. पर्यावरणाच्या दृष्टीने तलावाला महत्त्व देण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात या ऐतिहासिक स्थळाचे अस्तित्व धोक्यात येणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. नव्या बदलत्या काळात गणेश तलाव परिसराचा विकास होणे आवश्यक आहे.

गणेश तलाव हा प्राचीन ऐतिहासिक परिसर आहे. याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्य शासनाकडे निधीचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
- सुवर्णा सूर्यवंशी, (सरपंच,
कसबा बीड)

Web Title: Kasba Beed's Ganesh Talawar Center siege!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.