कसबा वाळवेत इच्छुकांच्या तयारीवर पाणी

By admin | Published: December 26, 2016 09:46 PM2016-12-26T21:46:42+5:302016-12-26T21:46:42+5:30

आरक्षणामुळे मतदारसंघात महिलाराज : दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा हा गट; उमेदवारीसाठीही होणार रस्सीखेच

Kasba is preparing for deserted water | कसबा वाळवेत इच्छुकांच्या तयारीवर पाणी

कसबा वाळवेत इच्छुकांच्या तयारीवर पाणी

Next

व्ही. जे. साबळे -- तुरंबे  कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघ दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा आहे. गतवेळी हा मतदारसंघ खुला होता. राष्ट्रवादीतील नाराजांच्या पाठबळावर आणि ‘स्वाभिमानी’शी युती करून काँग्रेसने हा गड जिंकला. सध्या ओबीसी महिला उमेदवारासाठी हा मतदारसंघ आरक्षित झाल्याने अनेकांचे मनसुबे उधळले; परंतु आता आपल्याच कार्यकर्त्यांच्या घरात उमेदवारीसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे, तर स्थानिक नेते आपल्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. जिल्हा परिषद ओबीसी, तुरंबे पंचायत समिती ओबीसी, तर कसबा वाळवे पंचायत समिती सर्वसाधारण महिला आरक्षितामुळे या मतदारसंघात महिलाराजच दिसते.
माजी आमदार नामदेवराव भोईटे यांनी या गटाचे नेतृत्व केले, तर त्यांच्या स्नुषा सुमित्रा उमेश भोईटे यांनीही आपल्या कार्याचा ठसा उमटवला. गतवेळच्या निवडणुकीत काँग्रेसने जिल्ह्यात पहिल्यांदा जि. प. सदस्य हिंदुराव चौगले यांना उमेदवारी देऊन गुगली टाकली. राष्ट्रवादीने कसबा वाळवे गावात अशोकराव फराकटे यांना उमेदवारी देऊन ईर्षा वाढवली. याचवेळी काँग्रेसने चुरस ओळखून आणि या परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद लक्षात घेत संघटनेशी युती केली. या खेळीमुळे काँग्रेसचे हिंदुराव चौगले विजयी झाले. तुरंबे पंचायत समिती मतदारसंघातून संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते अजित पोवार विजयी झाल्याने संघटनेला बळ मिळाले, तर फराकटे यांचा पराभव झाला. मात्र, वाळवे पंचायत समितीमधून राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक प्रल्हाद पाटील यांच्या थोडक्यात झालेल्या विजयाने सुरू राहिली.
आमदार प्रकाश आबिटकर यांना विधानसभेच्या विजयात काँग्रेसची उघड मदत झाली. आमदार सेनेचे असले तरी त्यांना काँग्रेसशी सख्य ठेवावेच लागेल. त्यामुळे थांबा कोणाला म्हणायचे, या धर्मसंकटात ते सापडणार आहेत. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे निकटचे कार्यकर्ते हिंदुराव चौगले हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी रेखा चौगले यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गतनिवडणुकीत मारुतीराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई गटाने चौगले यांना बळ दिले होते. यावेळी तसे होण्याची शक्यता कमी वाटते. कारण बजरंग देसाई गटाने तुरंबेच्या गणेश मंदिरासमोर जोरदार मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन गट बळकट करण्याची भूमिका घेतली आहे. दुसरे प्रबळ उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते मारुतराव जाधव यांच्या स्नुषा वंदना अरुण जाधव यांनी जोरदार तयारी केली आहे. पंचायत समितीच्या सत्तेचा त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी कौशल्याने उपयोग करत आपले वेगळे वलय निर्माण केले. गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जाधव गटाला डावलल्याने त्यांनी हिंदुराव चौगले यांच्या पदरात माप टाकले. यावेळी काँग्रेसने त्यांचा विचार केला नाही, तर त्यांची या मतदारसंघातील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तळाशीसह वरच्या वाड्यात त्यांचा स्वतंत्र गट आहे. २००२ च्या निवडणुकीत माजी उपसभापती अरुण जाधव यांचा किरकोळ मतांनी चौगले यांनी पराभव केला होता, तर २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुमित्रा भोईटे यांनी काँग्रेसच्या रेखा चौगले यांचा पराभव केला होता. स्वाभिमानीने सभापतिपदाचा धरलेला आग्रह काँग्रेसने नाकारला. त्यामुळे तोही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यात राज्यात खासदार शेट्टी भाजपबरोबर आहेत. शिवाय संघटनेची ताकद या परिसरात लक्षणीय आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य चौगले यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
राष्ट्रवादीला येथे उमेदवार शोधावा लागणार आहे. अशोकराव फराकटे यांनी सुरुवातीपासून जोरात तयारी ठेवली होती. मात्र, इतर मागास महिला आरक्षण आल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. यावेळी बजरंग देसाई गटाची भूमिका काँग्रेसला विचारात घ्यावी लागेल. या गटाचे जिल्हा सरचिटणीस भरत पाटील यांच्या पत्नी वनिता पाटील, चंद्रेचे माजी सरपंच प्रभाकर पाटील यांच्या पत्नी संगीता पाटील, राधानगरी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव तहसीलदार यांच्या भगिनी अंबिका तहसीलदार, सरिता प. शिंदे हे दावेदार आहेत. शिवाय तिटवेचे किरण नार्वेकर, अर्जुनवाडाचे नामदेव चौगले आपल्या पत्नीसाठी आग्रही आहेत.
राष्ट्रवादीकडून सुमन अशोक कांदळकर, मजरे कासारवाडाच्या सरपंच योगिता वारके, रश्मिन नईम अत्तार यांच्यासह अशोकराव फराकटे, चंद्रकांत संकपाळ, अशोक चौगले आपल्या पत्नीसाठी, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील व माजी पं. स. समिती सदस्य स्व. राजमहंमद पाटील यांची स्नुषा आरफिन शाकीर पाटील उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र, प्रत्येकाला ‘बिद्री’च्या चिमणीचे आकर्षण आहे.

काँग्रेसने वंदना जाधव यांना नाकारले, तर राष्ट्रवादी हा एक त्यांच्यापुढे पर्याय आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कसबा वाळवे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीच्या लढती अपेक्षित आहेत. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग हा एक भाजपसाठी सक्षम पर्याय होता. मात्र, त्यांची आरक्षणाने गोची झाली आहे. विकास पाटील यांच्या पत्नी सुरेखा, स्वप्नाली कपिल फराकटे, सुजाता गुरव या इच्छुक आहेत. यावेळची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. मात्र, खरी लढत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होण्याची शक्यता अधिक आहे.

कसबा वाळवे
पंचायत समिती सदस्य अजित पोवार यांनीही सभागृहात एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. आरक्षण आडवे आल्याने त्यांची जि. प. लढविण्याची संधी हुकली आहे. मात्र, ते पत्नी अपर्णा पोवार यांच्यासाठी आग्रही राहणार आहेत.

मतदारसंघात कसबा वाळवे, पालकरवाडी, चांदेकरवाडी, ठिकपुर्ली, माजगाव तळाशी, जोगेवाडी, बारडवाडी, चक्रेश्वरवाडी, ढेरेवाडी, कुराडवाडी, फणस, ढेरेवाडी, शेळेवाडी, चंद्रे, अर्जुनवाडा, तिटवे, मजरे कासारवाडा, तुरंबे, कपिलेश्वर या गावांचा समावेश होतो, तर मतदारसंख्या ३४,३३० इतकी आहे.

Web Title: Kasba is preparing for deserted water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.